अतिक्रमण थोपवून जागा पक्क्या करा : राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:22 PM2019-07-07T13:22:44+5:302019-07-07T13:23:40+5:30
भाजपमध्ये घेता का? असे म्हणणाऱ्यांची पक्षात रांग लागली आहे. त्यामुळे आपापले खुटे हलवून पक्के करा.
अहमदनगर : भाजपमध्ये घेता का? असे म्हणणाऱ्यांची पक्षात रांग लागली आहे. त्यामुळे आपापले खुटे हलवून पक्के करा. आपलेच गडी जिंकले पाहिजेत. पक्षामधील अतिक्रमण थांबवा आणि जिल्ह्यात १२-० अशा पद्धतीने विधानसभा निवडणूक जिंका, असा सल्ला पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना दिला.
भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शनिवारी नगरमध्ये प्रारंभ झाला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, पक्षाचे प्रभारी बाळासाहेब गावडे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, आमदार शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले, विरोधकांची भंबेरी उडाली आहे. शेवटच्या विधिमंडळाच्या अधिवेशनातही विरोधकांनी नांगी टाकली. विरोधी पक्षच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे यश आजमावण्याची पुन्हा संधी आहे, असे सांगून जिल्हात कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी करून पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले.
पत्रकारांशी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, पक्षातले कार्यकर्ते ढिले पडणार नाहीत, यासाठी त्यांना खुटा पक्का करण्याचा सल्ला दिला. पक्षाला अजिबात धोका नाही. जागा दाबून धरण्यात गर्भित इशारा आहे. लोकसभेत सगळीकडे मताधिक्य मिळाले. त्याचा वेग वाढविता आला पाहिजे. राज्यात विरोधी पक्षनेता होण्यासाठी ओढाताण आहे. विरोधी पक्ष नेताच आम्ही पक्षात आणला. केंद्रातही काँग्रेसला विरोधी पक्ष नेता मागेही मिळाला नाही आणि आताही नाही. विखे पक्षात आल्याने सर्व काही सोईस्कर होईल.
छावण्या सुरूच राहतील
पाऊस लांबला आहे. एक आॅगस्टपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे. बंद केलेल्या छावण्या पूर्ववत चालू करण्याचा शासनानेच आदेश दिला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातही वेगळा आदेश नाही. ज्या चालकांना छावण्या चालवायच्या नाहीत, अशा ठिकाणी शासन पर्यायी व्यवस्था करेल. छावणी चालकांची बिले देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. लोकांची मागणी असेल आणि छावणी चालकांची इच्छा असो की नसो, तिथे छावणी सुरूच राहील. लोकांची मागणी असेल तर टँकरही बंद केले जाणार नाहीत.
विखे असिस्टंट पालकमंत्री
नव्याने झालेल्या तीन मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री दिले नाही, याकडे लक्ष वेधले असता प्रा. राम शिंदे म्हणाले, पाच वर्षे पदावर राहिलेला मी पहिला पालकमंत्री आहे. नव्याने झालेले मंत्री (विखे) हे असिस्टंट पालकमंत्री राहतील. शासनाच्या धोरणानुसारच असे पद आहे.