शेवगावात पाण्यासाठी महिलांनी काढला हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 03:52 PM2017-12-14T15:52:40+5:302017-12-14T15:55:24+5:30
शेवगाव शहरातील प्रभाग अकरामधील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर परिसरातील महिलांनी पिण्याचे पाणी, घाणीचा प्रार्दुभाव, घंटागाडीचा अनियमितपणा, दूषित पाणी या प्रमुख मागण्यांसाठी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले.
शेवगाव : शेवगाव शहरातील प्रभाग अकरामधील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर परिसरातील महिलांनी पिण्याचे पाणी, घाणीचा प्रार्दुभाव, घंटागाडीचा अनियमितपणा, दूषित पाणी या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी भारतीय टायगर फोर्सचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले.
नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांनी नगराध्यक्षा विद्या लांडे व नगरसेवकासह मोर्चाला सामोरे जावून प्रमुख मागण्या सोडविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे मान्य केल्याने आंदोलन मागे घेतल्याचे संयोजकांनी जाहीर केले. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शेवगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. प्रभाग अकरामधील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर या भागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन चार इंच असल्याने या भागात अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सदरची पाईप लाईन ६ इंची करावी अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. या भागातील रहदारीच्या रस्त्यावर तसेच पाण्याच्या हॉलच्या परिसरात मोठे खड्डे पडल्याने व या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असल्याने डास व घाणीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात औषधाची फवारणी करावी, पडलेले खड्डे तात्काळ भरावे, कचरा वाहून नेणारी घंटागाडी नियमित येत नसल्याने कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. नगरपरिषदेत सत्ताधारी व विरोधकांचा लुटुपुटीचा खेळ सुरु आहे. पिण्याच्या पाण्यासह इतर समस्या कायम असून समस्या सोडविण्याची त्यांच्यात इच्छाशक्ती दिसत नाही. जनतेला किती दिवस पाणी व इतर समस्यांबाबत शांत बसविणार आहात? असा सवाल भारतीय टायगर फोर्सचे राज्याचे प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण यांनी केला.
यावेळी नगरसेविका इंदूबाई म्हस्के, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, शहराध्यक्ष लक्ष्मण मोरे, परशुराम पुजारे, संदीप म्हस्के, सुखदेव गायकवाड, अशोक गायकवाड, अमोल घोलप, नितीन दहिवाळकर, कॉ.संजय नांगरे, दत्तात्रय फुंदे, छाया वाघमोडे, चंद्रकला धोत्रे, शोभा मोरे, हौसाबाई म्हस्के, सुशीला धोत्रे तसेच प्रभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनकर्ते आक्रमक
मुुख्याधिकारी व संबंधितांनी मोर्चासमोर येऊन भूमिका जाहीर करेपर्यत आंदोलक जागेवरून उठणार नाहीत, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. आंदोलनात रिकामे हंडे घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून जटील बनलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर रोज होणाºया विविध आंदोलनामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.