पारधी कुटुंबाच्या हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या; आदिवासी भटके विमुक्त आघाडीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:50 PM2020-05-18T12:50:19+5:302020-05-18T12:51:23+5:30
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांग वडगाव येथील पारधी समाजातील तिघांची हत्या करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा. तसेच हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या वारसांना आरोपी निंबाळकरांची संपत्ती विकून प्रत्येकी १५ लाख रुपये मदत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक प्रा.किसन चव्हाण व सह समन्वयक अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
अहमदनगर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांग वडगाव येथील पारधी समाजातील तिघांची हत्या करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा. तसेच हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या वारसांना आरोपी निंबाळकरांची संपत्ती विकून प्रत्येकी १५ लाख रुपये मदत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक प्रा.किसन चव्हाण व सह समन्वयक अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार, व संजय बाबू पवार या तिघांच्या हत्याकांडाची चौकशी सी.आय.डी.मार्फत करावी. याप्रकरणी कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करणा-या युसूफ वडगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करावेत. पवार कुटुंबियांना गोड बोलून जमिनीचा ताबा घेण्यासाठी बोलविणा-या सरपंच व त्याच्या साथीदारांना याप्रकरणात सहआरोपी करावे.
बाबू पवार यांच्यासह त्यांची दोन मुले प्रकाश व संजय या तिघा बाप लेकांची १३ मे रोजी शेतीच्या वादातून सुरुवातीला अंगावर ट्रॅक्टर घालून, जायबंदी करून व नंतर तलवार व कुºहाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. निंबाळकर कुटुंबीय कसत असलेल्या शेत जमिनीचा निकाल पवार कुटुंबियांच्या बाजूने लागला. या रागातून नियोजनबद्ध पध्दतीने हे हत्याकांड करण्यात आले. मांग वडगाव या गावाला फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचा वारसा आहे. तेथे पारधी व मातंग समाजातील काही कुटुंबांनी एकत्र येऊन गायरान जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे. याकामी मानवी हक्क अभियानचे अॅड. एकनाथ आव्हाड, विश्वनाथ तोडकर व रमेश भिसे यांनी त्यांना गायरान जमिनी मिळवून देण्यासाठी लढा पुकारला होता.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथे १९७७ साली शेताच्या वादावरून पारधी समाजातील ११ जणांना जाळपोळ करून ठार मारले होते. या हत्याकांडात तेथील बड्या राजकीय कुटुंबाचा प्रत्यक्ष सहभाग होता. या हत्याकांडानंतर त्या परिसरातील पारधी समाजातील अनेक कुटुंबांनी इतरत्र स्थलांतर केले होते. त्यापैकी बाबू पवार यांचे कुटुंब मांग वडगाव येथे वास्तव्यास आले होते. तेथेही पवार व निंबाळकर कुटुंबीयांचा शेत जमिनीवरून वाद झाला होता. व त्यात निंबाळकर कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या खुनाचा सूड घेण्यासाठी निंबाळकर कुटुंबाने १३ मे रोजी हे हत्याकांड घडवून आणले. याबाबत युसूफ वडगाव पोलिस ठाण्याला पूर्वकल्पना देऊनही त्यांनी पवार कुटुंबाला संरक्षण देण्याऐवजी निंबाळकर कुटुंबाची पाठराखण केली. त्यामुळे हे हत्याकांड घडले. या घटनेत कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर देखील कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति गृहमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी भटके विमुक्त आयोग यांना देखील पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. जालिंदर घिगे यांनी दिली.