हंगा, वाघुंडे, आपधूप ग्रामपंचायतींची कारखान्यांकडील थकबाकी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:15 AM2021-06-26T04:15:49+5:302021-06-26T04:15:49+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील हंगा, वाघुंडे व आपधूप येथील ग्रामपंचायतींना एमआयडीसीतील कारखानदारांकडून मिळणाऱ्या कराची थकबाकी वाढली आहे. वसुलीसाठी ...
सुपा : पारनेर तालुक्यातील हंगा, वाघुंडे व आपधूप येथील ग्रामपंचायतींना एमआयडीसीतील कारखानदारांकडून मिळणाऱ्या कराची थकबाकी वाढली आहे. वसुलीसाठी त्यांनी आता एमआयडीसीकडे तगादा लावला आहे. ग्रामपंचायतींना कर रूपाने मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट आल्याने या गावातील विकासाची गती मंदावली आहे.
सुपा एमआयडीसीतील बहुतांश कारखाने हंगा गावच्या हद्दीत असून त्यापाठोपाठ वाघुंडे खुर्दमध्ये व आपधूप गावच्या हद्दीत काही कारखाने आहेत. पूर्वी ग्रामपंचायत संबंधित कारखान्यांकडून कर वसूल करून त्याचा विनियोग गावच्या विकासासाठी केला जात होता. परंतु, एमआयडीसी अंतर्गत येणारे रस्ते, झाडे, पाणी पुरवठा आदी मूलभूत सुविधा देण्यासाठी लागणारा निधी एमआयडीसीला उपलब्ध करावा लागत होता. कराचा संपूर्ण पैसा ग्रामपंचायतीकडे जमा होत असल्याने व त्या बदल्यात ग्रामपंचायत काहीच सुविधा पुरवत नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे होते. एमआयडीसी अंतर्गतचे रस्ते व अन्य सुविधांच्या देखभालीसाठी, दुरुस्तीसाठी निधीची कमतरता निर्माण झाल्याने या कामाअभावी एमआयडीसीची होणारी दुरवस्था दुर्लक्ष करण्यासारखी नव्हती. मध्यंतरीच्या काळात शासनाने याबाबत परिपत्रक काढून कर आकारणी ग्रामपंचायतीने करावी. वसुली एमआयडीसीने करून निम्मी रक्कम स्वतःकडे ठेऊन उर्वरित रक्कम त्या त्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. साधारण वर्षभरापूर्वी हा निर्णय झाल्याची माहिती मिळाली.
हंगा ग्रामपंचायतीला २०२०-२१ मध्ये कर रूपाने कारखान्यांकडून १ कोटी १० लाख ४६ हजार ३४७ रुपये येणे बाकी होती, अशी माहिती सरपंच बाळासाहेब दळवी व उपसरपंच वनिता शिंदे यांनी दिली. यातील ५० टक्के कर एमआयडीसीला तर ५० टक्के कर ग्रामपंचायतीला मिळणार होता. म्हणजेच ५० लाख ५० हजार २३ हजार रूपये हंगा ग्रामपंचायतीला मिळणार होते. त्यापैकी अवघे ४ लाख ४६ हजार ८२७ रूपये एमआयडीसीकडून प्राप्त झाल्याचे ग्रामविकास अधिकारी बबनराव आढाव यांनी सांगितले. वाघुंडे खुर्द गावच्या हद्दीत ७३ कंपन्या असून गतवर्षीची कराची बाकी १९ लाख रूपये असून चालू आर्थिक वर्षात २० लाखाच्या आसपास असल्याची माहिती सरपंच रेश्मा पवार व उपसरपंच मंगल मगर यांनी दिली. ग्रामपंचायतीला वाट्याचे २० लाख रूपये आले तर विकासकामांसाठी त्याचा विनियोग करता येईल असे ग्रामसेविका रेणुका भोर यांनी सांगितले.
आपधूप हद्दीत महावितरणचे सबस्टेशन व मिंडा कारखाना आहे. ३ वर्षांपासून उत्पादन प्रक्रिया सुरू असलेल्या मिंडा या कारखान्याची ग्रामपंचायतीकडे नोंदच केलेली नही. त्यामुळे कर आकारणीही करण्यात आली नसल्याचे सरपंच अजिंक्य गवळी यांनी सांगितले.
---
कारखान्याकडील कराची थकबाकी भरण्यासाठी सहा महिन्यापूर्वीच त्यांना पत्र दिले आहे. केवळ २-३ कारखान्यांनीच कराची बाकी भरली. कर वसुलीबाबत पाठपुरावा केला जाईल व कर जमा होताच ग्रामपंचायतींच्या वाट्याची रक्कम त्यांना पाठवली जाईल.
-एन. जी. राठोड,
अभियंता, करवसुली विभाग प्रमुख, एमआयडीसी