तंटामुक्तीतून तांदुळवाडी झाले हरितग्राम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:58 PM2018-09-21T17:58:25+5:302018-09-21T18:05:22+5:30
तालुक्यातील तांदुळवाडी हे सहा हजार लोकवस्तीचे गाव़ महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत २०१३-१४ मध्ये सहभागी झाले़ सात लाख रूपयांचा शासनाकडून पुरस्कार मिळाला़
भाऊसाहेब येवले
राहुरी : तालुक्यातील तांदुळवाडी हे सहा हजार लोकवस्तीचे गाव़ महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत २०१३-१४ मध्ये सहभागी झाले़ सात लाख रूपयांचा शासनाकडून पुरस्कार मिळाला़ पुरस्काराच्या रकमेतून विविध उपक्रम राबविले़ घरासमोर व शेतात लावण्यासाठी एक हजार अांब्याची झाडे लावल्याने आज हे गाव हरितग्राम झाले आहे.आंब्याचं गाव म्हणून या गावची ओळख झाली आहे.
तांदुळवाडीच्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी इंद्रभान पेरणे यांची तर उपाध्यक्षपदी विनीत धसाळ यांची निवड करण्यात आली़ समितीने गावातले तंटे गावातच मिटविण्याचा निर्णय घेतला़ गावकऱ्यांनी साथ दिल्याने तंटे गावातच मिटले़ शासनाने दखल घेऊन तत्कालीन तहसीलदार राजश्री आहिरराव, पोलीस निरीक्षक संजय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अरूण तनपुरे यांच्या हस्ते गावाला तंटामुक्तीचा सात लाख रूपयांचा पुरस्कार देण्यात आला.
प्रत्येक कुटुंबाला आंबे चाखायला मिळावे म्हणून एक वर्ष वयाची झाडे तत्कालीन गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकं दे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले़ गावकºयांनी लहान मुलांप्रमाणे आंब्याच्या झाडांचे संगोपन केले़ यंदा आंब्याची झाडे बहरली़ पर्यावरण व आरोग्य यादृष्टीने आंब्याची झाडे पूरक ठरली़ गावाचे सुशोभिकरण व्हावे म्हणून पुरस्काराच्या रकमेतून कमान उभारण्यात आली़ स्त्री जन्माचे स्वागत १०० मातांना साडी चोळी देऊन करण्यात आले़ खेळाडू, गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचा स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मान केला.
गावक-यांना कायमस्वरूपी आठवण राहावी व पर्यावरणाला हातभार लावावा म्हणून गावक-यांना आंब्याची रोपे वाटण्यात आली़ आजही ९० टक्के तंटे हे गावातच मिटतात़ त्यामुळे वेळ व पैशाची बचत होते़ गावक-यांनी साथ दिल्याने विविध उपक्रम राबविणे शक्य झाले.- -विनीत धसाळ, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती.
चांगल्या भावनेने आम्हाला आंब्याची रोपे दिली़ आम्ही योग्य पध्दतीने संगोपन केले़ पुढील पिढीला आंब्याची फळे चाखण्यास संधी उपलब्ध झाली़ गावात एकोपा निर्माण झाला. - सविता भांबळ, ज्येष्ठ नागरिक.