‘पीसीओ’टीमवर नगरकरांचा शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:39 PM2018-09-11T12:39:44+5:302018-09-11T12:39:53+5:30

राज्यातील मानाचा ‘पुरुषोत्तम करंडक’ जिंकणाऱ्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ‘पीसीओ’ एकांकिकेतील कलावंतांचा ‘लोकमत’ व छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठानने गौरव केला. 

Happy anniversaries of 'PCO' | ‘पीसीओ’टीमवर नगरकरांचा शुभेच्छांचा वर्षाव

‘पीसीओ’टीमवर नगरकरांचा शुभेच्छांचा वर्षाव

ठळक मुद्दे प्रयोग पाहून भारावले नगरकर : ‘लोकमत’ व शाहू प्रतिष्ठानने केला गौरव; हाऊसफुल्ल सभागृहात टाळ्यांचा कडकडाट

अहमदनगर : राज्यातील मानाचा ‘पुरुषोत्तम करंडक’ जिंकणाऱ्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ‘पीसीओ’ एकांकिकेतील कलावंतांचा ‘लोकमत’ व छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठानने गौरव केला. हाऊसफुल्ल सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात आणि नाट्यरसिकांच्या उपस्थितीत या एकांकिकेचे नगरकरांसमोर सादरीकरण झाले. हा प्रयोग पाहून नगरकरही भारावले. प्रयोग संपला तरीही अनेकजण सभागृहात खिळून राहिले होते. गतवर्षीच्या पुरुषोत्तम विजेत्या ‘माईक’ टीमचाही सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहाय्यक आयकर आयुक्त प्रशांत गांधले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, ‘एल अ‍ॅण्ड टी’चे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांच्या हस्ते ‘पीसीओ’ व ‘माईक’ एकांकिकेतील कलाकारांचा गौरव करण्यात आला. ‘पीसीओ’ एकांकिकेतील कलाकारांना प्रोत्साहन देणारे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव सुनील रामदासी, अ‍ॅड. अनंत फडणीस, प्राचार्या डॉ. अमरजा रेखी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नटराज पूजन करुन या गौरव सोहळ्याचा प्रारंभ झाला. ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके यांनी प्रास्तविक केले. उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सीए राजेंद्र काळे यांनी स्वागत केले. नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे यांनी आभार मानले. ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक सुदाम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास चित्रकार प्रमोद कांबळे, अनुराधा ठाकूर, गायक पवन नाईक, रसिक गु्रपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी, सतीश लोटके, शशिकांत नजान, सतीश डांगे, ‘सरगम’चे अध्यक्ष प्रा. राम शिंदे, हवामानतज्ज्ञ प्रा. बी. एन. शिंदे, अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक, प्रा. साताप्पा चव्हाण, प्रा. सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते़

‘पीसीओ’ टीमला आर्थिक मदत
स्वराज्य कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष आकाश दंडवते यांनी कामगारांच्यावतीने ‘पीसीओ’ टीमला आर्थिक मदत दिली. या मुलांनी नगरचे नाव उंचावले असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़

जिल्हाधिका-यांकडून ‘पीसीओ’चे कौतुक
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कलाकारांचा सत्कार करुन अखेरपर्यंत आवर्जून एकांकिका पाहिली. ‘अत्यंत सुंदर प्रयोग बघण्याची संधी मिळाली. एकांकिकेचे लेखन, दिग्दर्शन आणि सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. या मुलांनी नगरचे नाव मोठे केले, याचा जिल्हाधिकारी म्हणून मलाही अभिमान आहे.  मलाही ही गोष्ट सर्वत्र अभिमानाने सांगता येईल,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
‘पीसीओ’ एकांकिकेने मानाचा पुरुषोत्तम जिंकल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये वाचले. त्याचवेळी या मुलांचे कौतुक करण्याचे मनात आले होते. हा योग आज ‘लोकमत’मुळे जुळून आला. गत वर्षीही नगरच्या कलाकारांनी हा करंडक जिंकला हे विशेष. गेल्या ३६ वर्षांतील बॅकलॉग भरुन काढण्यासाठी नगरी कलाकारांना शुभेच्छा. या करंडकामुळे सांस्कृतिक क्षेत्रात नगरचे नाव उंचावले, त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असल्याचा मला अभिमान वाटतो, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

पीसीओ आणि माईक एकांकिकेतील कलाकारांचा सत्कार करण्याची संधी मिळाली ही आनंददायी बाब आहे. कलावंतांच्या पाठिशी राहणे हे आपले कर्तव्यच आहे, ते ‘लोकमत’ सोबत निभावता आले याचा आनंद आहे.- मनिषा काळे-बारस्कर, नगरसेविका

Web Title: Happy anniversaries of 'PCO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.