‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By Admin | Published: August 17, 2015 12:00 AM2015-08-17T00:00:12+5:302015-08-17T00:02:54+5:30

लोकमत अहमदनगर आवृत्तीच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी हजारो नागरिकांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा सस्नेह वर्षाव केला.

Happy show on 'Lokmat' | ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

अहमदनगर : श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस....चैतन्य फुलविणारी रम्य सायंकाळ...लोकमत भवनच्या हिरवळीवर राजकीय-सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची रंगलेली मैफील...सामान्य वाचकांपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी...विद्युत रोषणाईचा प्रकाशझोत..सनईचे श्रवणीय संगीत आणि मसालेदार दुधाचा मनमुराद आस्वाद घेत विविध विषयांवर गप्पा रंगल्या. लोकमत अहमदनगर आवृत्तीच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी हजारो नागरिकांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा सस्नेह वर्षाव केला. नगर जिल्ह्यातील शतकभरातील राजकीय-सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे जीवन चरित्र नव्याने उलगडणाऱ्या लोकमतच्या ‘पथदर्शी’ विशेषांकाचे वाचकांनी भरभरून कौतुक केले. या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीचा २८ वा वर्धापनदिन शनिवारी लोकमत भवनच्या हिरवळीवर हजारो वाचकांच्या उपस्थितीत साजरा झाला. लोकमतशी असलेले अतूट नाते गेल्या २८ वर्षांपासून जिल्हावासीयांनी जपले आहे. त्याचीच प्रचिती शनिवारी झालेल्या वर्धापनदिनाच्या स्नेहमेळाव्यात आली.
हजारो वाचकांनी लोकमतला भेट देऊन आपला स्नेह वृद्धिंगत केला. सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
नगर जिल्ह्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवून देणारे अनेक दीपस्तंभ जिल्ह्यात आहेत. त्यांच्या कर्तृत्त्वाने प्रगतीचे नवे मापदंड तयार झाले. अशाच उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या यशाची गुपिते उलगडणारा, प्रगतीची झेप घेणाऱ्या कार्यपद्धतीचा अनोखा विचार झरा म्हणजेच पथदर्शी! पथदर्शींचे जीवन जवळून पाहणारे त्यांची मुले, नातू, स्नेही यांच्या लेखणीतून उलगडणारे हृदयस्पर्शी भावविश्व हे या विशेषांकाचे खास वैशिष्ट्य आहे. अशा या वाचनीय, संग्रही पथदर्शी विशेषांकाचे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक अशा शब्दात मंत्री शिंदे, विखे पाटील यांनी पथदर्शी विशेषांकाचे कौतुक केले.
वर्धापनदिनानिमित्त झालेल्या स्नेहमेळाव्याला पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड,माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार अरुणकाका जगताप, आमदार सुधीर तांबे, आमदार संग्राम जगताप, आमदार राहुल जगताप, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार दादा पाटील शेळके, नगरचे महापौर अभिषेक कळमकर, उपमहापौर सुवर्णा कोतकर, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, राष्ट्रसंत ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, राम शेठ मेंघानी, कडूभाऊ काळे आदींनी लोकमतला शुभेच्छा दिल्या. लोकमतचे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्ती प्रमुख अनंत पाटील यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.

Web Title: Happy show on 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.