कष्टक-यांचे नेते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 04:03 PM2019-08-18T16:03:12+5:302019-08-18T16:03:24+5:30

दुष्काळी पारनेर तालुक्यातील कष्टकरी व शेतक-यांना हाताला काम व खायला धान्य मिळवून देण्यासाठी लढा उभारणारे, सावकारांच्या ताब्यात गेलेल्या शेतक-यांच्या जमिनी शेतक-यांना मिळवून देणारे, विधानसभेत कष्टक-यांंच्याच प्रश्नावर आवाज उठवणारे, गोवा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये थोर क्रांतिकारक सेनापती बापट यांच्याबरोबरीने आंदोलने करणारे नेतृत्व, कम्युनिस्ट चळवळीतील तळपता सूर्य, पारनेरच्या शिक्षण क्षेत्राचा पाया रचणारे व्यक्तिमत्त्व, जीवनात खरे व स्पष्ट बोलणारे परखड, निर्भयपणे वागले पाहिजे, खोटी स्तुती करू नये, खोट्या स्तुतीपासून दूर रहावे, असे आचरणात आणून कार्यकर्त्यांना बळ देणारे पारनेर-नगर मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणजे कॉ. भास्करराव औटी.

Hard-working leaders |  कष्टक-यांचे नेते 

 कष्टक-यांचे नेते 

अहमदनगर : पारनेरमधील तुकाराम औटी व साळुबाई औटी यांच्या पोटी भास्करराव औटी यांचा जन्म झाला़ वडिलांचे निधन झाल्यावर आईने काबाडकष्ट करून त्यांना वाढवले़ याची जाणीव भास्कररावांना होती़ म्हणून त्यांनी प्रथम शिक्षणाला प्राधान्य दिले़ सन १९३२-३३ चा काळ. भास्करराव पारनेरहून प्राथमिक शिक्षण घेऊन नगरला मॅट्रीकसाठी  शिक्षणासाठी गेले़ त्यावेळी मॅट्रीक परीक्षा पुणे येथे होत असे़ पण पुणे येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था नसल्याने ते व रावसाहेब म्हस्के बोर्डिंगमध्ये राहत होते़ याचवेळी इतर तालुक्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचीही राहण्याची व जेवणाची व्यवस्था होत नसल्याचे लक्षात आले़ दोघांनी मिळून त्या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था बोर्डिंगमध्ये केली़ बोर्डिंगचे व्यवस्थापक रावसाहेब नवले यांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी दोघांसह त्या विद्यार्थ्यांनाही बाहेर काढले़ भास्करराव औटी व रावसाहेब म्हस्के यांनी मग सिद्धीबागेतील महादेव मंदिराजवळ परिसरात राहण्याचे ठरवले़ तोपर्यंत त्यांनी रावसाहेब नवले यांना एकूण जमा ४० रूपये झाल्याचा हिशोब दिला़ रावसाहेब यांना त्या दोघांची चुणूक दिसली़ त्यांनी त्यात आणखी दहा रूपये दिले़ त्या ५० रूपयांतून भास्करराव औटी व रावसाहेब म्हस्के पुणे येथे परीक्षेसाठी गेले़ मॅट्रीक चांगल्या मार्काने पास झाले़
भास्करराव औटी यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर जिल्हा लोकल बोर्ड व नगर न्यायालयात नोकरी केली़ त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ते अव्वल कारकून झाले़ इंग्रजीवर असणाºया प्रभूत्वामुळे जिल्हाधिकाºयांनी त्यांना वरिष्ठ पातळीवर बढती घेण्यासाठी आग्रह धरला़ मात्र भास्करराव हे चळवळीचे कार्यकर्ते असल्याने सरकारी नोकरदार असूनही कम्युनिस्ट पक्षाच्या गुप्त बैठकांना ते जात होते़ त्याचवेळेस पारनेर तालुक्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती आणि लोकांना हाताला काम व खायला धान्य नव्हते़ तसेच शेतकºयांच्या जमिनी सावकारांकडे गहाण टाकण्याचे प्रमाणही मोठे होत असल्याचे त्यांच्या कानावर येत होते़ यामुळे भास्करराव अस्वस्थ होत असत़ त्यांनी आता आपल्याला जन्मभूमीसाठीच वेळ देऊन तेथील शेतकरी वर्गाला न्याय देण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला आणि पारनेरला आले़ सामाजिक चळवळीला प्रारंभ केला़
नोकरी सोडून आल्यानंतर भास्करराव औटी पारनेरमध्ये सावकार विरोधी चळवळीत सहभागी झाले़ त्यांचे चुलते नामदेव औटी त्यावेळी ही चळवळ राबवत होते़ शेतकºयांच्या अनेक जमिनी सावकारांच्या ताब्यात होत्या़ त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता़ एकीकडे दुष्काळाने मारले़ दुसरीकडे स्वत:ची शेती समोर दिसत असतानाही तिचा उपयोग नाही़ हाताला काम नाही़ धान्य नाही़ अशा परिस्थितीत जखडलेला शेतकरी त्यांच्याकडे येऊन गाºहाणे मांडू लागला़ शेवगाव येथे असतानाच मिरत खटल्यात स्थानबद्ध असलेले कॉ़ मिरजकर यांच्याशी त्यांचा संबंध आला़ त्यांच्यावर मार्क्सवादाच्या विचारांचा पडलेला प्रभाव, सत्यशोधकी विचार, स्वातंत्र्य चळवळ, कॉ़ देशपांडे यांचेही मार्क्सवाद, लेनीनवाद यावर ऐकलेली भाषणे यामुळे त्यांच्यावर आधीच मार्क्सवादाचा प्रभाव वाढला होता़  कै.चंद्रभान आठरे यांच्याबरोबर वाढलेल्या संपर्कातून त्यांनी १९४६ मध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला़
१९४६ च्या दरम्यान तेलंगणा कम्युनिस्ट पक्षाने शेतकºयांसाठी सशस्त्र उठाव केला होता़ त्यावेळी काँग्रेस सरकारने देशभरातील कम्युनिस्ट नेत्यांना अटक करण्याचे धोरण अंगिकारले होते़ त्याच दरम्यान पारनेरमध्ये कॉ़ भास्करराव औटी यांनी किसान सभेचे काम सुरू ठेवले होते़ पारनेरला कॉ़ रामराव परूळेकरांची सभा घेतली़ त्यामुळे पोलिसांचे लक्ष या सभेकडे गेले आणि त्यांना पकडण्यासाठी पोलीस आले होते़ तोपर्यंत भास्करराव भूमिगत झाले़ सुमारे सात ते आठ महिने भास्करराव भूमिगत होते़ त्यानंतर आठ महिन्यांनी त्यांना अटक करण्यात आली़ ते विसापूर कारागृहात होते़ सुमारे दोन वर्षे तुरूंगात होते़ त्यांच्याबरोबर पारनेरचे त्रिंबकराव औटी, लक्ष्मण धोंडिबा औटी, दत्तू पाटीलबा औटी, अर्र्जुनराव औटी, एकनाथ कार्ले, सुखलाल लोढा, भाऊ रामू औटी, सहादु कावरे, गणपती औटी, धोंडिबा औटी हे सुद्धा तुरूंगात होते़
सन १९५२ मध्ये विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने कॉ़ भास्करराव औटी यांनी निवडणूक लढवली़ काँग्रेसचे बाळासाहेब भगत त्यांच्याविरोधात होते़ त्याकाळी कम्युनिस्ट व काँग्रेस असाच प्रभावशाली सामना होता़ भास्कररावांनी कम्युनिस्ट चळवळ उभी केल्याने त्याचा फायदा त्यांना झाला़ निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी दोन हजार मतांनी विजय मिळवला़ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून त्यांची निवड झाली़ १९५७ च्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला़
कॉ़ भास्करराव औटी यांचा ताराबाई यांच्याबरोबर विवाह झाला होता़ आमदार झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम चळवळीत त्यांनी स्वत:ला सेनापती बापट यांच्याबरोबर झोकून दिले़ स्वत: आंदोलनात असताना पारनेरला त्यांच्या पत्नी ताराबाई सुद्धा आंदोलनात उतरल्या़ त्यांनाही अटक झाली़ सारे कुटुंबच चळवळीत उतरल्याने पारनेरमधील अनेक आंदोलक यात सहभागी झाले होेते़ प्रत्यक्ष सेनापती बापट यांनीही कॉ़ भास्करराव औटी यांच्या कार्याचे अनेकवेळा कौतुक केले़ कॉ़ भास्करराव औटी यांचे अनेक आंदोलनात योगदान होते़ कॉ़ भास्करराव औटी यांना ललिता, विद्याधर, विजय, मंदा, पुष्पा अशी पाच मुले होती़ त्यांच्याकडेही आंदोलनकाळात लक्ष देण्याची कसरत ताराबाई करीत होत्या़
कॉ़ भास्करराव औटी यांनी सन १९५२ ते १९६२ या कालावधीत विधानसभेत प्रतिनिधीत्व करताना शेतकरी शासनाच्या महसुलाने कर्जबाजारी कसा होतो, याचा सखोल अभ्यास करून विधानसभेत आवाज उठविला़ शेतकºयांच्या उत्पन्नाइतकाच महसूल घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती़ कारण दुष्काळी भागात शेतकºयांचे उत्पन्न कमी मिळत असे व शासनाचा शेतसारा जास्त येत आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते़ ज्या शेतकºयांचे जास्त उत्पन्न आहे, त्यांना जास्त शेतसारा करावा, असेही त्यांनी सुचविले होते़ यातून सामान्य शेतकºयांना मोठा फायदा झाला.
 कुळाने असलेल्या जमिनींचा सर्वाधिक वाटा शेतकºयांना द्यावा यातून शेतीची व पर्यायाने शेतकºयांची प्रगती होईल असेही त्यांनी विधानसभेत मांडले होते़ आणेवारी ठरवण्याची सरकारची पद्धतही चुकीची असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले़ एखादे विकास काम करीत असताना तेथील अधिकारी संबंधित गावातील दोन-चार लोकांना बोलावून
 तेथूनच आराखडा तयार करतात़ मात्र त्या भागात विकासकामे करताना कशाची उपलब्धता आहे, हे त्यांना माहिती नसते़ यातून तेथे शासकीय यंत्रणा अपुरी पडते़ त्यामुळे गावातील सर्वांनाच एकत्रित घेऊन विकासकामे केल्यास तेथील सर्व परिस्थितीची माहिती घेउन विकास कामांचे नियोजन करावे, असे त्यांचे नियोजन होते़ 
 पारनेरमध्ये न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर महाविद्यालय, शेतकरी संघ, पारनेर सेवा संस्था यासह विविध संस्था उभारणीत त्यांचा मोेठा वाटा होता़ पारनेरमध्ये विविध शाळा खोल्या बांधण्यावर त्यांनी भर दिला़  १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले़ सध्याचे पारनेरचे आमदार व विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी हे भास्कररावांचे चिरंजीव़  
नगर जिल्ह्यात डाव्या चळवळींचा प्रभाव होता. या चळवळीत जे बिनीचे शिलेदार होते. त्यात औटी यांचे नाव आघाडीवर होते. 

लेखक : विनोद गोळे, लोकमत पारनेर तालुका प्रतिनिधी

Web Title: Hard-working leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.