हरहुन्नरी बासरीवादक इसाकभाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:02 PM2019-01-29T12:02:58+5:302019-01-29T12:03:52+5:30
महाराष्ट्रात विविध प्रकारच्या लोककला आपणास पहावयास मिळतात. दिवसेंदिवस काळानुसार या लोप पावत चाललेल्या लोककला आजपर्यंत ग्रामीण भागातील कलाकारामुळे टिकून आहेत.
करंजी : महाराष्ट्रात विविध प्रकारच्या लोककला आपणास पहावयास मिळतात. दिवसेंदिवस काळानुसार या लोप पावत चाललेल्या लोककला आजपर्यंत ग्रामीण भागातील कलाकारामुळे टिकून आहेत. बॅण्ड हा त्यातीलच एक प्रकार आहे. करंजी येथील प्रसिद्ध भाई - भाई बॅण्डचे संस्थापक मालक इसाकभाई महेबुब पठाण यांचे नुकतेच आजारपणामुळे दु:खद निधन झाले. त्यांच्या बॅण्ड पथकामुळे करंजीचे नाव जिल्ह्यातच नव्हे राज्यात प्रसिद्ध झाले होते. बॅण्ड पथकातील मास्टर समजल्या जाणा-या इसाकभाई यांच्या निधनाने जिल्ह्यातील या लोककलेत मोठी पोकळी निर्माण झाली.
इसाकभाई पठाण यांचे वडिल महेबुबभाई एक नामांकित ताशा वादक होते. दोन्ही हातावर पेटलेल्या दोन -दोन पणत्या ठेवून पणती न हलता ते ताशा वाजवत असत. हे त्यांचे अलौकिक वेगळेपण होते. त्यांनाझुंबरभाई, बशीरभाई, नजिरभाई, शब्बीरभाई व इसाक अशी पाच मुले. इसाकभाई सर्वात लहान होते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, त्यानुसार महेबुबभाई यांनी रशिदभाई व इसाकभाई यांना अहमदनगर येथील मुन्शीभाई यांच्याकडे ही कला शिकण्यासाठी पाठविले. त्यात इसाकभाई उत्कृष्ट बासरीवादक झाले तर रशिदभाई अप्रतिम ट्रायपॅड वादक म्हणून आजही जिल्ह्यात परिचित आहेत. संगिताचे शिक्षण पूर्ण होताच त्यांनी करंजी येथे भाई - भाई ब्रास बॅण्डची स्थापना केली. उपजतच सर्व बंधू कलाकार होते. त्यातच त्यांना सहकलाकार गावातीलच भेटले. त्यांनाही त्यांनी चांगली कला शिकविली. त्यामध्ये झुंबर शिंदे, बाबा रोकडे, रमेश क्षेत्रे, ज्ञानदेव क्षेत्रे, गुलाबभाई पठाण, शांतवन क्षेत्रे, फकिर महंमद अशा १४ ते १५ कलाकारांचा जबरदस्त संच तयार केला. राज्यभरातून अनेक ठिकाणासून आपल्या घरातील मंगल कायार्साठी करंजीच्या बॅण्डची लोक मागणी करू लागले. हा बॅण्ड अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रसिद्धीच्या झोतात येवून करंजीची ओळख राज्यभर झाली.
त्याकाळी तमाशाला मोठया प्रमाणात प्रसिद्धी होती. तमाशाची आवड असणारा ग्रामीण भागात मोठा प्रेक्षकवर्ग होता. महाराष्ट्रातील अनेक नामवंत तमाशा फडात इसाकभाई यांना बासरी वादनाची आॅफर येवू लागली. १९९२ मध्ये पुणे आकाशवाणी केंद्रावर त्यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम झाला. ते मान्यताप्राप्त आकाशवाणी कलाकार होते. आपली कला दुस-याला दिल्याने कला वाढतच जाते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इसाक भाईने जिल्हयात अनेक कलाकार घडविल. बॅण्डच्या कला क्षेत्रात आपले, गावाचे व परिसराचे नाव राज्यभर पोहचविले. एखाद्या गरीब कुटुंबाकडे लग्नासाठी द्यायला पैसे नसले तरी इसाकभाई स्वत: जाऊन लग्न वाजवत असत. ठराविक रक्कमच द्या असा कधीही आग्रह इसाकभाईंनी कोणाकडेच धरला नाही. असा हा ग्रामीण भागातील हाडाचा हरहुन्नरी कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला. आजच्या धावपळीच्या युगात आणि डिजेच्या दणदणाटापुढे लोप पावत चाललेली बॅण्डची कला मात्र इसाकभाईंनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपली.
- अशोक मोरे, करंजी, ता.पाथर्डी जि.अहमदनगर