Anna Hazare Hunger Strike : सरकारच्या निषेधार्थ नगरमध्ये रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:23 PM2018-03-29T12:23:10+5:302018-03-29T12:25:22+5:30
केंद्र सरकार याची दखल न घेतल्यामुळे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगरमध्ये अण्णा समर्थकांनी माळीवाडा बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या ७ व्या दिवशी प्रकृती चिंताजनक झाली आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकार याची दखल न घेतल्यामुळे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगरमध्ये अण्णा समर्थकांनी माळीवाडा बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेवून आंदोलकांनी १० मिनिटात रास्ता रोको मागे घेतला. परंतू आज संध्याकाळपर्यंत अण्णांचे उपोषण न सुटल्यास खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर रात्री जागरण गोंधळ घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित कुलकर्णी यांनी नगर भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांच्या असंवेदनशील भूमिकेचा समाचार घेतला.
उद्योजक किशोर मुनोत म्हणाले, काँग्रेस सरकारनंतर मोठ्या अपेक्षेने जनतेने मोदी सरकारला निवडून दिले. परंतु जनलोकपालसह शेतकऱ्यांसाठी निवडणूक जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने ४ वर्षे झाली तरी पाळलेली नाही. ही जनतेची फसवणूक आहे. मोदींनी आता ‘मनकी बात’ बंद करून ‘काम की बात’ करावी, असा उपरोधक सल्लाही मुनोत यांनी दिला.
आंदोलनात गिरीश कुलकर्णी, सुभाष शिंदे, निलेश मुदिगोंडा, संदीप कुसळकर, ओंकार भालेराव, तुलसीभाई पालीवाल, विशाल अहिरे, वैशाली खिलारी, वर्षा गवारे आदींनी सहभाग घेतला.