मेव्हणीच्या नावाने त्याने बनविले फेसबुक अकाउंट; आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 05:15 PM2020-02-28T17:15:56+5:302020-02-28T17:17:18+5:30
नात्याने मेव्हणी असलेल्या अल्पवयीन मुलीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून तिची बदनामी करणाºया तरुणाला येथील सायबर पोलिसांनी शुक्रवारी (दि़२८)अटक केली आहे.
अहमदनगर: नात्याने मेव्हणी असलेल्या अल्पवयीन मुलीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून तिची बदनामी करणा-या तरुणाला येथील सायबर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) अटक केली आहे.
रमेश अशोक कावरे (रा़ कुकाणा ता़ नेवासा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. रमेश कावरे हा त्याच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलीला गेल्या काही महिन्यांपासून व्हिडिओ कॉल करून तसेच व्हिडिओ पाठवून त्रास देत होता. एक दिवस रमेश याने सदर मुलीच्या घरी जाऊन तिला उचलून नेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सदर मुलीच्या नावे फेसबुकवर एक बनावट अकाउंट तयार करण्यात आले. या अकांउंटवरून सदर मुलीच्या नात्यातील एका व्यक्तीला मेसेज पाठविले. याबाबत सदर मुलीने येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला. तेव्हा रमेश कावरे यानेच हे बनावट अकाउंट तयार केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला कुणाणा येथून अटक करत त्याच्यावर गुन्ह दाखल केला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे निरिक्षक अरुण परदेशी, उपनिरिक्षक प्रतिक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्टेबल अभिजित अरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड, भगवान कोंडार, वासूदेव शेलार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.