पुरवठा पथकाच्या हातावर तुरी देणारा ‘तो’ चालक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:58 AM2021-02-20T04:58:51+5:302021-02-20T04:58:51+5:30
शेवगाव : शेवगाव पोलीस ठाण्यातून पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन लघुशंकेच्या बहाण्याने पसार झालेल्या ‘त्या’ चालकाला पकडण्यात ...
शेवगाव : शेवगाव पोलीस ठाण्यातून पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन लघुशंकेच्या बहाण्याने पसार झालेल्या ‘त्या’ चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून अमरापूर येथील धान्य प्रकरणाशी निगडीत आणखी नावे व माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील अमरापूरगावाच्या शिवारात धान्याने भरलेला टेम्पो ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सोमवारी ( दि.८) पकडला गेला होता. टेम्पो चालकाला अटक केल्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी सांगितले.
मात्र, त्या चालकाला पोलीस ठाण्यातून पळवून लावणारे कोण? त्यांची नावे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. अमरापूरहद्दीत ८० क्विंटल धान्य काळ्या बाजारात घेऊन जाताना टेम्पो (क्र. एम. एच. १६- एई. ३३४५) पकडण्यात आला होता. ‘त्या’ टेम्पोच्या चालकाकडे धान्य व परवाना संबंधित चौकशी केली असता मला इथे थांबण्यासाठी सांगण्यात आले आहे. वरिष्ठ फोन करून कुठे गाडी खाली करायची हे सांगणार आहेत. अशी उत्तरे मिळाल्याने सतर्क नागरिकांनी तहसीलदार अर्चना पागिरे यांना संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली होती.
त्यावेळी नायब तहसीलदार व्ही. के. जोशी, प्रभारी पुरवठा निरीक्षक एस. एम. चिंतामण यांनी धान्याचा पंचनामा करत टेम्पो व चालकाला पुढील चौकशीसाठी शेवगाव पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र फिर्यादी फिर्याद देण्यापूर्वी तो चालक लघुशंकेचा बहाणा करून तेथून पळाला होता.
पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे यांच्या पथकाने प्रल्हाद दिनकर पवार (रा. नवगण, राजुरी, जि. बीड) यास त्याच्या गावातून ताब्यात घेऊन शेवगाव येथे आणले आहे.