बरा होतो आजार : चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये वाढतोय मधुमेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 01:11 PM2020-01-22T13:11:15+5:302020-01-22T13:12:19+5:30
चुकीची आहारपद्धती आणि बदललेली जीवनशैली यामुळे तरुण वयातच मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
साहेबराव नरसाळे ।
अहमदनगर : चुकीची आहारपद्धती आणि बदललेली जीवनशैली यामुळे तरुण वयातच मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागामध्ये उपचार घेतल्यानंतर ५ तरुणांचा मधुमेह पूर्णपणे बरा झाला आहे. डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये पाळल्यास आणि व्यायाम केल्यास रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण नियंत्रणात आणता येते, असे डॉ़ शौनक मिरीकर यांनी सांगितले.
साधारणत: ६ टक्के रुग्णांमध्ये मधुमेह आढळून येतो़. रोजच्या जीवनातील ताणतणाव, व्यायाम नसणे, पचण्यास जड आहार घेणे यामुळे मधुमेह होऊ शकतो. त्याशिवाय अनुवंशिकता व स्थूलता या कारणांमुळेही मधुमेह होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम इन्सुलिन करते. मात्र, पोटातील अन्नाशयात इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरिरातील साखरेचे प्रमाण वाढते. सध्या तरुणांमध्ये व्यायामाचा अभाव आढळून येत आहे.
तसेच त्यांची आहारशैलीही बदलली आहे. ताणतणावही वाढले आहेत. त्यामुळे जठराजवळ असणा-या पॅनक्रियाज या अवयवातून पाझरणा-या इन्सुलिनचेप्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण वाढत असून, त्यातून अंधत्व, हृदयविकार किंवा मूत्राशयाचे विकार उद्भवत आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात येणा-या रुग्णांमध्ये ३०-४० वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक आहे.
डॉ़.मिरीकर यांनी नुकताच ५ तरुणांचा मधुमेह पूर्णपणे बरा केला आहे. मधुमेह पूर्णपणे बरा होण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये रुग्णांनी पाळायला हवीत, असे डॉ़ मिरीकर म्हणाले.
मधुमेहाची लक्षणे
वारंवार लघवीला आल्यासारखे वाटणे, तहान लागल्यासारखे वाटणे, अचानक वजन कमी होणे, प्रचंड भूक लागणे, दृष्टी कमजोर होणे, हातापायात चमकल्यासारखे वाटणे, थकवा जाणवणे, त्वचा कोरडी पडणे, जखमा ब-या होण्यास वेळ लागणे. याशिवाय मळमळ, उलटी येत असल्यासारखे वाटणे, पोटात दुखल्यासारखे वाटणे अशी लक्षणे मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात़.
मधुमेहाचे दोन प्रकार
मधुमेहाचे दोन प्रकार सांगितले जातात. त्यात पहिल्या प्रकारात (मधुमेह टाईप-१) शरिरात इन्सुलिन अत्यंत कमी प्रमाणात तयार होते किंवा इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया थांबते. दुस-या प्रकारात (टाईप-२) स्थूलतेमुळे शरिरातील इन्सुलिन तयार होण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो़. त्यामुळे रक्तातील साखर वाढत राहते. व्यायामाअभावी शरीर स्थूल होते़ स्थूल शरिरामुळे आलेला मधुमेह आपल्याकडे अधिक आढळतो़.
कसा असावा आहार
आहारात तंतूमय (विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये किंवा मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे इत्यादी) पदार्थांचा समावेश असावा. आहारातील कर्बोदकाचे प्रमाण कमी असावे. बेकरीचे पदार्थ व फास्ट फूड खाणे टाळावे़ ताजी फळे, भाज्यांचा आहारात वापर वाढवावा़ झोपण्यापूर्वी अडीच ते तीन तास आधी जेवण घ्यावे. मधुमेह रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहाराचे नियोजन करावे.
मधुमेह पडताळणीसाठी प्रश्नावली
मधुमेह पडताळणीसाठी ३० प्रश्नांची प्रश्नावली केली आहे. प्रत्येक प्रश्नाला गुण देण्यात आले आहेत. ३० प्रश्नांची उत्तरे भरल्यानंतर येणारे गुणांकन मधुमेहाची शक्यता ठरविण्यास मदत करतात. त्यामुळे उपचार किंवा पथ्य पाळणे शक्य होते. ही प्रश्नावली आयुष विभागात भरुन द्यावी, असे आवाहन केले आहे.
मधुमेह प्रतिबंधक मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद
जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागातील डॉक्टरांनी मधुमेह प्रतिबंधक व नियंत्रण मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेत मधुमेह पडताळणीची प्रश्नावली भरून घेतली जात आहे. त्या माध्यमातून संबंधितांच्या मधुमेहाची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर संबंधितांना मार्गदर्शन करून आहाराची पथ्ये सांगितली जात आहेत. मात्र, या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, सुमारे १५० जणांनीच मधुमेह पडताळणी प्रश्नावली भरुन आयुष विभागातील डॉक्टरांकडे जमा केल्या आहेत़
मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो़ त्यासाठी पथ्य पाळणे आवश्यक आहे़ ५ तरुणांचा मधुमेह पूर्णपणे बरा झाला आहे़ त्यामुळे मधुमेह बरा होत नाही, गैरसमज मनातून काढून टाकावा़ आम्ही ३० प्रश्न असलेली प्रश्नावली तयार केलेली आहे. ती भरून घेतल्यानंतर मधुमेह किती टक्के आहे, हे स्पष्ट होऊ शकते, असे आयुष विभागाचे डॉ.शौनक मिरीकर यांनी सांगितले.