दर महिन्याला आरोग्य शिबिर
By Admin | Published: August 8, 2014 11:46 PM2014-08-08T23:46:41+5:302014-08-09T00:22:50+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचे वास्तववादी चित्र ‘लोकमत’ने शुक्रवारी जिल्ह्याच्या समोर आणले.
अहमदनगर : जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचे वास्तववादी चित्र ‘लोकमत’ने शुक्रवारी जिल्ह्याच्या समोर आणले. या यंत्रणेतील दोष, त्रुटी आणि चुकीच्या कामकाजाचा लेखाजोखा वाचून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनीही हे प्रकरण गंभीरपणे घेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारी यांचा थेट जनतेशी संबंध यावा, यासाठी दर महिन्याला संबंधित आरोग्य केंद्राच्या हद्दीतील गावात सक्तीने आरोग्य शिबिर घेण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुगणालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील वास्तववादी चित्र ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या प्राथमिक आरोग्यातील कामकाजात सुधारणा करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. मात्र, या निमित्ताने काही ठिकाणी असणाऱ्या त्रुटी समोर आल्या आहेत. त्या सोडविण्यावर भर देण्यात येणार आहेत.
यापुढे दर महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत एका गावाची निवड करून त्या ठिकाणी खासगी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने सर्व रोगाचे आरोग्य शिबिर घेण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच दररोज कोणत्याही परिस्थितीत सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी यांना सक्तीने उपस्थित ठेवण्यात येणार आहे.
या वेळेत तालुकाअधिकारी यांनी कोणत्याच बैठका घेऊ नयेत, अथवा त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी रुग्णवाहिकेची अडचण आहे, त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या १०२ आणि १०८ क्रमाकांच्या टोल फ्री नंबरचा वापर करून रुग्णवाहिका बोलवून घ्यावी, जिल्ह्यात सर्वच ठिकाणी जीवनदायी योजनेच्या माहितीचे फलक लावून अधिकाधिक लोकांना या योजनेची माहिती देण्यास सांगण्यात आले आहेत.
मुख्यालयात न राहणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभाग अकस्मात भेटी देऊन शहानिशा करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना आणि आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी दिलेले आहेत. पुढील सहा महिन्यात जिल्ह्यातील ६० टक्के प्राथमिक केंद्रातील कामकाज आयपीएचसी (इंडियन पब्लिक हेल्थ स्डँडर्ड) नुसार करण्यास प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पी.बी. गंडाळ यांना सूचना दिलेल्या आहेत. रिक्त असणारी पदे भरण्यासाठी आरोग्य उपसंचालक यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)