सुपा परिसरातील तीस गावांसाठी आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:40 AM2021-03-04T04:40:05+5:302021-03-04T04:40:05+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील ३० गावातील लोकांपर्यंत मोफत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उपक्रमास सुरुवात झाली आहे. ...
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील ३० गावातील लोकांपर्यंत मोफत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उपक्रमास सुरुवात झाली आहे. सुप्यातील शिबिरात रूग्णांची लक्षणीय उपस्थिती होती. विस्तारित औद्योगिक वसाहतीतील कॅरियर मायडिया व स्नेहालय संस्था यांच्यातर्फे ग्रामीण जनतेसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आले.
या अंतर्गत ३० गावातील जवळपास ३ हजार लोकांपर्यंत मोफत आरोग्य सेवा पोहचविण्याचे नियोजन केले आहे. याची सुरुवात जी. के. एन. प्रकल्पात युवा प्रेरणा शिबिरात सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी शिबिर आयोजित केले होते. स्नेहालयचे संचालक अनिल गावडे या उपक्रमाचे समन्वयक आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. महेश कांबळे, डॉ. घनश्याम वाळके, डॉ. सुरज पवार, डॉ. वांढेकर आदी वैद्यकीय व्यावसायिक शिबिरार्थींना आरोग्य सेवा देत आहेत. मार्च अखेरपर्यंत ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू नागरिकांना आरोग्य सुविधा पोहचविण्याचा स्नेहालय संस्था व कॅरियर मायडिया यांचा मानस असल्याचे कंपनीचे विद्यानंद यादव यांनी सांगितले.
स्नेहालय संचालित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम राबविला जात आहे. संस्थेच्या फिरत्या दवाखान्यात शारीरिक तपासणी, योग्य औषधोपचार, रक्त-लघवी तपासणी आदी सुविधा मोफत पुरविल्या जातात. आतापर्यंत कॅरियर मायडिया व स्नेहालय संस्था यांनी इसळक–निंबळक, जातेगाव, वाघुंडे बुद्रूक, मुंगशी, वाघुंडे खुर्द, बाबुर्डी, हंगा आणि पळवे बुद्रूक व सुपा येथे पार पडल्याची माहिती कंपनीचे एचआर विभागाचे जनरल मॅनेजर पंकज यादव यांनी दिली. एक हजाराहून अधिक रूग्णांना या शिबिरांचा लाभ झाला असल्याचे कॅरियर मायडियाचे एचआर सिनियर मॅनेजर गौतम साबळे यांनी सांगितले.
सुपा येथे बाजारतळावर आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या प्रारंभ प्रसंगी कॅरिअर मायडियाचे उत्पादन व्यवस्थापक निलेश ढगे, उद्योजक योगेश रोकडे, अमोल मैड, उपसरपंच सागर मैड, ग्रामपंचायत सदस्य दत्ता पवार, माजी सभापती दीपक पवार, मनोज बाफना, कैलास दहीवळ आदी उपस्थित होते.