कर्मचाऱ्यांअभावी आरोग्य विभागच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:00+5:302021-02-09T04:24:00+5:30
ग्रामीण भागात लोकांना मोफत उचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेची जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५५५ आरोग्य उपकेंद्र आहेत. ...
ग्रामीण भागात लोकांना मोफत उचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेची जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५५५ आरोग्य उपकेंद्र आहेत. यामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांसह आरोग्य सेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक महिला, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सहायक पुरुष, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कुष्ठरोग तंत्रज्ञ, सफाई कामगार अशी २००३ पदे मंजूर आहेत. परंतु यातील ९१५ पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आरोग्याचे प्रश्न असल्याने आरोग्य केंद्रात नेहमीच वर्दळ असते. परंतु कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवा देण्यास आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आरोग्य सेवकांची वाढीव पदे शासनाने मंजूर केलेली आहेत. परंतु गेल्या पाच वर्षांपासून शासकीय भरती न झाल्याने रिक्त जागांचे प्रमाण वाढतच जात आहे.
कोरोना काळात सर्वाधिक महत्त्वपूर्ण जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी उचलली. किंबहुना आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित झाले. त्यामुळे शासनाने आरोग्य विभागातील पदे प्राधान्याने भरण्याचा संकल्प केला आहे, मात्र अद्याप त्याला मुहूर्त मिळालेला नाही.
----------
आता उपकेंद्रात पूर्णवेळ डाॅक्टर
दरम्यान, आरोग्य उपकेंद्रांवर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून ३७१ जणांची कंत्राटी पद्धतीने नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता उपकेंद्रात पूर्णवेळ डाॅक्टर उपलब्ध असणार आहेत. परंतु त्यांना आवश्यक सहायक पदेही भरणे गरजेचे आहे.
-----------
पूर्वीची व काही नवीन मंजूर झालेली अशी एकूण आरोग्य विभागात ९१५ पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर ताण येतो. परंतु तरीही आहे त्या कर्मचाऱ्यांकरवी उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्याचा प्रयत्न असतो.
- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
-----------
आरोग्य विभागातील पदांचा गोषवारा
कर्मचारी भरलेली पदे रिक्त पदे
आरोग्य सेवक महिला ४७० ५०६
औषध निर्माण अधिकारी ८१ २१
आरोग्य सहायक महिला ८३ २०
आरोग्य सेवक पुरुष २७० २९२
आरोग्य सहायक पुरुष ११९ ११
आरोग्य पर्यवेक्षक १२ ७
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी १० ४
कुष्ठरोग तंत्रज्ञ १ ०
सफाई कामगार ४२ ५४
------------------
एकूण १०८८ ९१५