सुपा परिसरातील आरोग्य, शिक्षण क्षेत्र गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:16+5:302021-03-29T04:14:16+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील आरोग्य व शिक्षण क्षेत्राचा विकास गतिमान झाला आहे. कोरोनामुळे ...
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील आरोग्य व शिक्षण क्षेत्राचा विकास गतिमान झाला आहे. कोरोनामुळे सरकारी निधीला कात्री लागल्याने रखडलेल्या कामांपैकी शाळेच्या वर्गखोल्या, स्वच्छतालय, सरकारी दवाखान्यासाठी लागणारी उपकरणे, विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसीतील कारखान्यांनी आपल्या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अशी कामे सुरू केली आहेत.
६९ वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञानदानात सहयोग देणाऱ्या वाघुंडे बुद्रूकच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीला आता निरोप दिला जाणार असून तेथे कॅरिअर मायडिया कारखान्याच्या माध्यमातून ३ वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू झाले आहे. एमआयडीसीतील कारखान्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातून काही भाग स्थानिक जनतेच्या विकासासाठी खर्च करण्याची तरतूद असली तरी कारखाना प्रशासन व स्थानिक नागरिक यांच्या संबंधाचा परिणाम या मदतीवर होत आहे. स्थानिक नागरिक व कारखान्यांचे प्रशासन यांच्यात सकारात्मक व सहकार्याचे संबंध असतील तर भविष्यात हा मदतीचा ओघ वाढू शकतो.
सध्या सुपा एमआयडीसी झपाट्याने विकसित होत असून अनेक कारखाने सुरू आहेत. टप्पा २ व ३ मध्ये तर मोठे प्रकल्प येणार असल्याने त्यांच्या माध्यमातून या भागातील आरोग्य व शिक्षणासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. परंतु, स्थानिक लोक व कारखानदार यांच्यातील संबंधात दुरावा निर्माण झाला तर हाच निधी त्यांच्याकडून मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्या फंडात पाठविला जातो. असे झाल्यास स्थानिक विकासाला खीळ बसते.
सुपा विस्तारित एमआयडीसीतील कॅरिअर मायडियाच्या माध्यमातून तेथे तीन नवीन वर्गखोल्या बांधण्याच्या कामाचा प्रारंभ झाला. शिक्षणासाठी आता नवीन व सुरक्षित निवारा उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक चिंतामुक्त झाल्याचे सरपंच संदीप वाघमारे व उपसरपंच गणेश रासकर यांनी सांगितले. वाघुंडेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सध्या २ वर्गखोल्या उपलब्ध असून पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या शाळेसाठी इमारतीची मोठी अडचण असल्याचे या शाळेतील शिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.
स्नेहालयाच्या माध्यमातून तीन वर्गखोल्या येत्या ३ ते ४ महिन्यात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील, असे खजिनदार जयकुमार मुनोत व जनसंपर्क अधिकारी सचिन ढोरमले यांनी सांगितले. यावेळी कॅरिअर मायडियाचे प्लँट हेड जय देव, एचआर हेड पंकज यादव, विकास गुगणानी, गौतम साबळे, विजयानंद, उत्पादन अधिकारी निलेश ढगे आदी व्यवस्थापकीय अधिकारी, सरपंच संदीप वाघमारे, उपसरपंच गणेश रासकर, शरद रासकर, दत्ता दिवटे, विक्रम गाडीलकर, दत्तात्रय शिंदे, माजी सरपंच संदीप मगर आदी उपस्थित होते.
---
कारखान्यांचे विविध उपक्रम..
कॅरिअर मायडियाद्वारे ३० गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे घेण्यात आली. जवळपास ६० लाखांची कामे सीएसआर फंडाच्या माध्यमातून केली. जाफा कारखान्याने हंगा येथील न्यू इंग्लिश स्कूलला आधुनिक स्वच्छतालय बांधून दिले तर गणराज इस्पातने सुपा येथील रयत शैक्षणिक संकुलातील विद्यालयास संरक्षक भिंत बांधून दिली. कॅरिअर मायडिया कारखान्याने विद्यार्थ्यांना वॉटर कुलर, वाघुंडे शाळेसाठी तीन वर्ग खोल्या, बुद्रूक येथील बाळानंद स्वामी विद्यालयास ४ वर्गखोल्या, भैरवनाथ विद्यालयास व प्राथमिक शाळेस प्रत्येकी स्वच्छतालयासाठी निधी दिला आहे.
--
२८ सुपा
वाघुंडे बुद्रूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन तीन वर्गखोल्या बांधकामाचा प्रारंभ करताना कॅरिअर मायडीयाचे जनरल मॅनेजर पंकज यादव व इतर.