आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By Admin | Published: March 2, 2015 01:18 PM2015-03-02T13:18:57+5:302015-03-02T13:18:57+5:30

गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. या अपयशासाठी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

The health ministry should resign | आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

>अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. या आजाराने राज्यात झालेले मृत्यू आणि रुग्णांची वाढती संख्या हे आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे मोठे अपयश असल्याने बेजबाबदार अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करावे आणि आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 
राज्यात सर्वत्रच स्वाईन फ्लूचा आजार मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांत यातून झालेल्या मृत्यूंची संख्या पाहता लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक औषधांचा आणि लसींचा तुटवडा जाणवत आहे. शासकीय रुग्णालयातून, प्राथमिक आरोग्य केंद्रातून रूग्णांना योग्य तो सल्ला मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तरीही आरोग्य विभागाचे अधिकारी याबाबत गंभीर नाही. त्यांची निष्क्रियता यातून समोर आली असल्याचे विखे यांनी सांगितले. 
स्वाईन फ्ल्यूचे गांभीर्य लक्षात घेऊन या विभागातील संचालक, उपसंचालकांनी अद्याप कुठेही दौरे केलेले नाहीत. या आजारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या संदर्भातही त्यांनी माहिती जाणून घेतली नाही. 
या त्यांच्या बेजबाबदारपणामुळेच स्वाईन फ्ल्यूच्या आजाराची नेमकी वस्तुस्थिती समोर येऊ शकलेली नाही. 
अधिकार्‍यांचा हा बेजबाबदारपणा लक्षात घेऊन त्यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीही या आजाराबाबत पाहिजे तेवढे गांभीर्य दाखविले नाही. अधिकार्‍यांना पाठिशी घालण्याचे कामच त्यांच्याकडून झाले असल्याने त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे यांनी केली. (प्रतिनिधी)
 
■ स्वाईन फ्लूच्या आजाराबाबत आवश्यक असणारी औषधे आणि लस यांची उपलब्धता शासनाने ताताडीने करून द्यावी. राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या माध्यमातून जोडण्यात आलेल्या सर्व रुग्णालयांत या औषधाचा पुरवठा करावा आणि स्वतंत्र कक्ष उभारून शासकीय रुग्णालयातून योग्य ती मदत नागरिकांना मिळण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही विखे यांनी केली आहे.
नुकसानीचे पंचनामे करा
■ राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मोठय़ा प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना मदतीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही विखे यांनी केली आहे. या नुकसानीसंदर्भात आपण लवकरच राज्याचा दौरा करणार असून, यासंदर्भात सविस्तर निवेदन काँग्रेसतर्फे मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, असेही विखे म्हणाले. 

Web Title: The health ministry should resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.