टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:19+5:302021-09-15T04:26:19+5:30
विनोद गोळे पारनेर : इमारत जुनाट, वीज व्यवस्था खराब, त्यामुळे ऑपरेशन सुविधा नाही. ऑक्सिजन नाही आणि रुग्णांना ॲडमिट करून ...
विनोद गोळे
पारनेर : इमारत जुनाट, वीज व्यवस्था खराब, त्यामुळे ऑपरेशन सुविधा नाही. ऑक्सिजन नाही आणि रुग्णांना ॲडमिट करून उपचारसुद्धा करता येत नाहीत, अशी दयनीय अवस्था पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाची असल्याने परिसरातील सुमारे १५ ते २० गावांतील लोकांना उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे.
टाकळी ढोकेश्वर येथे ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयाचा टाकळी ढोकेश्वरसह तिखोल, पळसपूर, पोखरीसह दहा ते पंधरा गावांतील रुग्णांना आरोग्य सुविधा मिळावी म्हणून हे रुग्णालय उभारण्यात आले. सध्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे इथे कोणतीही नवीन सुविधा उपलब्ध करता येत नसल्याचे दिसून येते. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचारी कमी असल्याने आरोग्य सेवेवरही त्याचा परिणाम होत आहे.
................
कोरोनात रुग्णांची गैरसोय
ऑक्सिजन सुविधा नाही, इमारत चांगली नाही यासह इतर सुविधा नसल्याने टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या दोन्ही लाटेत कोरोना उपचार केंद्र सुरू करता आले नाही.
...........
टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात फक्त सध्या लसीकरण केंद्र आहे, बाकी सुविधा नसल्याने वैद्यकीय अधिकारी येथे थांबत नाही. त्यामुळे येथे सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे, असे रुग्णालय समितीचे सदस्य शरद झावरे, अजित सोनावळे यांनी सांगितले.
.........
१५ परिचारिका, वैद्यकीय अधिकारी कमी
पारनेर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये सध्या ११ वैद्यकीय अधिकारी व २५ परिचारिका कार्यरत आहेत. त्याचा फायदा ग्रामीण भागात होत आहे. आणखी १५ परिचारिका, वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्यास गावागावात रुग्णांवर प्राथमिक उपचार होतील.
..............
अपुऱ्या सुविधा तरीही रुग्णसेवा
पारनेर ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या सुविधा असतानाही तेथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सर्व कर्मचारी, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी रुग्णसेवा करीत आहेत. कोरोना काळात त्यांनी रुग्णांना मोठा आधार दिला.
......
१४ टाकळी ढोकेश्वर