पावसाची दडी, शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:25+5:302021-06-27T04:15:25+5:30
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरात रोहिणी नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, पावसाने ...
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरात रोहिणी नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने मूग, बाजरी, सोयाबीन, तूर आदी पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या पावसावरच टाकळी ढोकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली आहे. परंतु, पेरणी झाल्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकांची वाताहत होऊ लागली आहे. ऐन जोमात असलेली पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती मशागत, बियाणे, खते, पेरणीचा खर्च वाया जाणार आहे. त्यानंतर दुबार पेरणी करायची म्हणजे पुन्हा शेती मशागत, बियाणे, खते खरेदी करून पेरणी करावी लागणार आहे. त्याचा खर्च वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे पुन्हा संकट उभे राहिले आहे.
परिसरातील तलाव, ओढे, नाले, बोअरवेल, विहिरीही कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.