पाणलोटात पावसाचा जोर; भंडारदरा ७५ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:11 PM2020-08-13T17:11:16+5:302020-08-13T17:11:48+5:30
भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे साडे सहा इंचाहून अधिक तर रतनवाडी, पांजरे भंडारदरा येथे सुमारे पाच इंच पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात चोवीस तासांत अर्ध्या टीएमसीहून अधिक पाणी येत धरणसाठा ७५ टक्के झाला.
राजूर / भंडारदरा : भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे साडे सहा इंचाहून अधिक तर रतनवाडी, पांजरे भंडारदरा येथे सुमारे पाच इंच पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात चोवीस तासांत अर्ध्या टीएमसीहून अधिक पाणी येत धरणसाठा ७५ टक्के झाला.
दरम्यान हरिश्चंद्र गडाच्या परिसरातील पर्वत रांगांत जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने कोतूळ जवळील मुळा नदीच्या विसर्गात वाढ होत आहे. यामुळे या मोसमात पहिल्यांदा मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. गुरुवारी सकाळी हा विसर्ग १४ हजार ३२२ क्युसेक इतका होता. यामुळे मुळा धरणातही नवीन पाण्याची आवक वाढली आहे.
भंडारदरा धरणात संपलेल्या चोवीस तासांत ५१९ दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा ८ हजार २३६ दशलक्ष घनफुटापर्यंत पोहचला.
दरम्यान, कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांतही पावसाचा जोर कायम आहे.त्यातच निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाकी येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. निळवंडे धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी सहा वाजता ५ हजार १४ दशलक्ष घनफूट झाला होता.