बेलपिंपळगाव हद्दीत हॉटेल चालकाचा निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:38 IST2024-03-13T13:38:22+5:302024-03-13T13:38:29+5:30
बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली घटना : तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार

बेलपिंपळगाव हद्दीत हॉटेल चालकाचा निर्घृण खून
पाचेगाव (जिल्हा अहमदनगर): पहाटे झोपेत असताना एका हॉटेल चालकाचा डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृण खून करण्यात आल्याची घटना श्रीरामपूर नेवासा मार्गावरील लोखंडी फॉलजवळ बेलपिंपळगाव(ता.नेवासा) शिवारात बुधवारी(दि.१३) पहाटे घडली. सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली.
बाळासाहेब सखाहरी तुवर(वय अंदाजे ६०) रा. कारवाडी(पाचेगाव) ता. नेवासा असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. श्रीरामपूर नेवासा मार्गावरील लोखंडी फॉल नजीक ओम साई नावाने ते हॉटेल चालवीत होते. बुधवारी(दि.१३ मार्च) पहाटेच्या सुमारास झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून घटनेचा तपास सुरु असून दुपारी न्यायवैद्यक पथकही दाखल झाले होते.
उपनिरीक्षक विजय भोंबे, बिट हवालदार बबन तमनर, सुमित करंजकर, पोलीस नाईक आप्पासाहेब वैद्य, राहुल गायकवाड घटनेचा तपास करत असून हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.