हेल्मेटची ‘अ‍ॅलर्जी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 05:53 PM2018-12-22T17:53:29+5:302018-12-22T17:53:35+5:30

१ डिसेंबरपासून नगर शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली. लागलीच पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला.

Helmet's 'Allergy' | हेल्मेटची ‘अ‍ॅलर्जी’

हेल्मेटची ‘अ‍ॅलर्जी’

गोरख देवकर

अहमदनगर : १ डिसेंबरपासून नगर शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली. लागलीच पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला. हेल्मेट घालण्याची इच्छा नसूनही अवघे शहर हेल्मेटमय होऊ लागले. घरी हेम्लेट नसल्यामुळे अनेकजण खरेदीसाठी रस्त्यावर उतरले. ज्यांच्याकडे अधिपासूनच हेल्मेट आहे त्यांनी धूळ झटकून हेल्मेट डोक्यात कोंबले. हेल्मेट सक्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्वसामान्यांसह अगदी पोलीस प्रशासनासह इतर विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात आहे. कारवाई करणारे पोलिसही हेल्मेट घालूनच कारवाई करत आहेत. त्यामुळे ओळखीचा पोलिस असला तरी ओळखू येत नाही. त्यामुळे सेटलमेंट करणे जरा अवघड झाले आहे. दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसल्यास पाचशे रूपयांचा दंड तर केलाच जात आहे. त्यापुढे जाऊनही वाहन चालविण्याचा परवानाही रद्द केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. हीच कमावण्याची संधी म्हणून विक्रेत्यांनी रस्त्याच्या बाजूला दुकाने थाटली. कारवाईच्या भीतीने दुचाकी चालकांची हेल्मेट खरेदीची लगबग सुरू आहे. पाचशे रुपयांचा दंड भरावा लागू नये, म्हणून प्रत्येकजण खबरदारी घेत आहे. जिकडे पोलीस नसतात त्या मार्गाने लोक जात आहेत. त्यासाठी दररोज पाच दहा रुपयांचे पेट्रोल जास्त लागले तरी हरकत नाही. मात्र हेल्मेट न घेणारेही महाभाग आहेत. ‘सक्ती’ किती दिवस राहणार यावर अनेकजण तर्क-वितर्क लढवित आहेत.
यापूर्वी शहरात हेल्मेट सक्तीचा झालेला प्रयोगाचा दाखला काहीजण देत आहे. तो प्रयत्न कसा फसला? यावरही काथ्याकूट केला जात आहे. पुणेकर, औरंगाबादकरांनी हेल्मेट सक्ती ‘टोलावली’, तशीच नगरकरही पोलिसांची ही सक्ती ‘झुगारून’ देतील, असे काहीजण छातीठोकपणे सांगतात. पण रस्त्यावरील चित्र काहीसे उलटेच दिसते. पोलिसांच्या नियोजनबद्ध कारवाईने ऐनवेळी अनेकांची धावपळ उडते. पोलीस थेट कारवाईचे ‘शुटिंग’च करीत आहेत. पोलिसांनी अडविल्यानंतर कोणालाच ‘तथाकथित’ भाऊ, दादा, भैय्या कोणाशीच संपर्क करता येत नाही. अन् एखाद्याने फोन केलाच तर त्याचा काही फायदा होत नाही. कोणताच ‘वशिला’ सध्या तरी कामाला येत नाही. पुढे येऊपण शकतो. शेवटी सेटलमेंट करणार नाही तो माणूस कसला. मात्र सध्या तरी ५०० रुपयांचा दंड भरावाच लागत आहे.
सध्या अनेकजण हेल्मेटचे फायदे आणि तोटे यावर करत आहेत. हेल्मेटचे फायदे कमी आणि तोटेच अधिक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. हेल्मेट सक्ती व्हावी, असे वाटणारे किंवा ‘राजीखुशी’ हेल्मेट वापरणारे अगदीच बोटावर मोजण्याइतकेच. ते लोक तुम्हाला हेल्मेटचे फायदेच सांगतील. डोके, डोळे, कान, दात, धूळ, धूर, कर्णकर्कश आवाज, आदींपासून दुचाकीस्वाराचे संरक्षण करण्याचे काम हेल्मेटच करते. मुली, महिला रस्त्यावरून चालताना अथवा दुचाकीवरून जाताना चेहºयाचा ‘रंग उडू नये’ यासाठी तोंडाला ‘स्कार्फ’ बांधतात. काही पुरुष रुमाल बांधतात. मग त्यांना हेल्मेट वापरायला काय अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातो.
तर याउलट हेल्मेट नको, असे म्हणणारेही कमी नाहीत. ते त्यांची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करतात. हेल्मेट घातल्यानंतर आवाज येत नाही, आजूबाजूचे दिसत नाही, ते जडच असते, अशी प्रमुख कारणे दिली जातात. याशिवाय ‘रस्त्यावरील खड्डे आधी बुजवा नंतर हेल्मेटचे बोला’, वाहतूक शिस्तीचे काय? कोणी कसेही वाहने चालवितात? त्याकडेही लक्ष द्या? रिक्षा, अ‍ॅपे चालकांना कोण शिस्त लावणार? दुचाकीस्वारांवरच कारवाई का? असे प्रश्न अनेकजण उपस्थित करतात. तशी चर्चा तर सुरुच राहणार आहे. शहराच्या बाजूला असलेल्या ‘आर्मी’च्या एरियामध्ये जाताना हेल्मेट घालूनच जावे लागते. मग शहरातच हेल्मेट वापरायला अडचण काय? असाही प्रश्न उपस्थित होतो.एकूणच सध्या सुरु असलेली सक्ती जोरात आहे. चर्चाही जोरात आहे. सध्या तरी चर्चा आणि सक्ती कायम राहावी, एवढीच इच्छा...

Web Title: Helmet's 'Allergy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.