नीलेश लंके यांच्या कोविड सेंटरला देश-विदेशातून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:06+5:302021-05-13T04:22:06+5:30
पारनेर : कोरोनाच्या महामारीत वर्षभराहून अधिक काळ रुग्णांची सेवा करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांच्या सेवाभावावर देश-विदेशातील नागरिकांनीही विश्वास ठेवला ...
पारनेर : कोरोनाच्या महामारीत वर्षभराहून अधिक काळ रुग्णांची सेवा करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांच्या सेवाभावावर देश-विदेशातील नागरिकांनीही विश्वास ठेवला आहे. त्यांनी भाळवणी येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरासाठी (कोविड सेंटर) देश-विदेशातून तब्बल सव्वाकोटीची रोख मदत जमा झाली. मावळातील (जि. पुणे) नागरिकांनी तांदुळ, तर कोकणवासीयांनी रुग्णांसाठी हापूस आंबे पाठविले आहेत.
१४ एप्रिल रोजी लंके यांनी भाळवणी येथील नागेेश्वर मंगल कार्यालयात १ हजार १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले. त्याचदिवशी लंके समर्थकांसाठी शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी वीस लाख रुपयांची मदत घोषित केली. दुसऱ्या दिवसापासून तालुक्यासह तालुक्याबाहेरूनही मदतीचा ओघ सुरू झाला. कोणी भाजीपाला, कोणी फळे, तर कोणी धान्याची पोती भाळवणी येथील आरोग्य मंदिरात आणून टाकली. रुग्णांसाठी अंडी, सुकामेवा आदी देणाऱ्यांचीही रिघ लागू लागली. धान्याची तर रास लागल्याने, आता धान्य पाठवू नका, इतर आवश्यक मदत पाठवा, असे सांगण्याची वेळ आली. प्रशासनाकडून रुग्णांसाठी औषधे देण्यात येत आहेत. मात्र पुरवठा अपुरा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लाखो रुपयांची औषधेही येत आहेत.
---
अनेक देशांमधूनही मदत
येथील कोविड सेंटरला पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, कॅनडा आदी देशांमधून नीलेश लंके प्रतिष्ठानच्या खात्यावर रक्कम जमा होऊ लागली आहे. देश-विदेशातील मदतीचा ओघ दिवसेंंदिवस वाढतच असून राज्याच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमधून मदत जमा होत आहे.
---
कोकणवासीयांनाही भुरळ..
आ. लंके यांचा करिष्मा दूरचित्रवाहिनी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिल्यानंतर कोकणातील तरुणांनी थेट आ. लंके यांच्याशी संपर्क साधून रुग्णांसाठी खास हापूस आंबे तसेच कोकणी तांदुळ पाठवित असल्याचे सांगितले. ते भाळवणीच्या आरोग्य मंदिरात पोहोचदेखील केले.
--
चिमुरडे, अंगणवाडी सेविकांचीही मदत...
या कोविड सेंटरला मतदारसंघातील अनेक चिमुरड्यांनीही मदत दिली. त्यांनी बचत बँकेत साठविलेले, सायकलसाठी साठविलेले पैसे सेवाभावी कार्यासाठी सुपूर्द केले. अंगणवाडी सेविका, विधवा, परित्यक्तांनीही शक्य होईल तेवढा मदतीचा हातभार लावला आहे.