सारोळा सोमवंशी ग्रामस्थांची ७५ हजार रुपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:49+5:302021-05-31T04:16:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क देवदैठण :श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी ग्रामस्थांनी सामाजिक बांधीलकी जपत देवदैठण येथील अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
देवदैठण :श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी ग्रामस्थांनी सामाजिक बांधीलकी जपत देवदैठण येथील अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरातील रुग्णांंच्या उपचारासाठी ७५ हजार रुपयांची मदत केली.
महिन्याभरात देवदैठणसह परिसरातील शेकडो सर्वसामान्य रुग्णांनी या ठिकाणी मोफत उपचार घेतले. येथे सारोळा सोमवंशी गावातील १२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यामुळे आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून सारोळा सोमवंशीच्या सरपंच उज्ज्वला आढाव यांच्या पुढाकारातून कोविड सेंटरला रोख स्वरूपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना ग्रामस्थांनी अगदी १०० रुपयांपासून ते थेट ५००० रुपयांपर्यंत मदत करताना तब्बल ७५ हजार रुपयांची रोख मदत करून सामाजिक बांधीलकी जोपासली.
उपसरपंच अंजाबापू कवाष्टे, पोलीस पाटील कैलास उदार, प्रवीण मापारे, विष्णू नवले, शरद आढाव, राहुल आढाव, अशोक भालेकर, भाऊसाहेब लोंढे, किरण नवले, बापू आढाव यांनी ही मदत पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी पिंपळगाव पिसा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी जयदेवी राजेकर, ग्रामसेवक वैशाली बोरुडे, ॲड. सुवर्णा वाघमारे आदी उपस्थित होते.
300521\img_20210530_170010.jpg
सारोळा सोमवंशी ( ता. श्रीगोंदा ) ग्रामस्थांच्या वतीने ७५ हजार रुपये रोख मदत पं.स. सदस्या कल्याणी लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करताना उपसरपंच अंजाबापू कवाष्टे व मान्यवर (छायाचित्र - संदीप घावटे )