Ahmednagar: यापुढे बैलांची वेदनारहित नसबंदी, पशुसंवर्धन विभागात अंमलबजावणी
By चंद्रकांत शेळके | Published: June 19, 2023 04:44 PM2023-06-19T16:44:53+5:302023-06-19T16:44:58+5:30
Ahmednagar:
- चंद्रकांत शेळके
अहमदनगर : पारंपरिक पद्धतीने बैलांना वेदना देत त्यांची नसबंदी (खच्चीकरण) करण्याची पद्धत बंद करून बैलांना भूल देऊन त्यांची वेदनारहित नसबंदी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सुरुवात केली आहे. यासाठी ॲनिमल राहत संघटनेने पुढाकार घेतला असून, राज्यभर हा प्रयोग केला जात आहे. नगरमध्येही नुकतीच याबद्दल कार्यशाळा होऊन पशुवैद्यकांना याबाबत माहिती देण्यात आली.
गायींची लागवड पारंपरिक पद्धतीने बैलाद्वारे करण्याऐवजी कृत्रिम रेतनाला पशुसंवर्धन विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. कारण, या प्रक्रियेतून पाहिजे तशी जातिवंत पैदास करता येते. त्यामुळे बैलांच्या नसबंदीसाठी (खच्चीकरण) पशुसंवर्धन विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाते. मात्र, आतापर्यंत पशुपालकांकडून पारंपरिक अमानवी पद्धतीने आणि पशुवैद्यकाशिवाय नसबंदी केली जात होती. बैलांना जबरदस्तीने जमिनीवर पाडून चिमट्याच्या साहाय्याने अंडाशयातील शुक्रवाहिनी बंद केली जायची. यातून अनेक दुष्परिणाम समोर येऊ लागले. प्रामुख्याने बैलाला प्रचंड वेदना होत असे. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या ॲनिमल राहत संघटनेने नसबंदीसाठी भुलीचा पर्याय समोर आणला. त्याबाबत पशुसंवर्धन विभागाशी चर्चा करून आता हा आदेशच निघाला आहे.
दरम्यान, ही मोहीम पुढे नेण्यासाठी ॲनिमल राहत संस्था आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हानिहाय कार्यशाळा होत आहेत. नगरमध्येही नुकतीच अशी कार्यशाळा झाली. त्यात जिल्ह्यातील सरकारी पशुवैद्यकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला पशुसंवर्धनचे उपआयुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुकुंद राजळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक ठवाळ यांच्यासह जिल्ह्यातील ८५ पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.
गेल्या वर्षी २८ हजार बैलांची नसबंदी
नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २८ हजार बैलांची नसबंदी करण्यात आली. परंतु, ती पारंपरिक पद्धतीने झाली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली. परंतु, यापुढे आता भूल देऊनच बैलांची नसबंदी केली जाणार आहे. शासकीय तसेच खासगी पशुवैद्यकांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत.