यापुढे वाळू वाहतूक होत असलेल्या रिक्षा पेटविण्यात येतील...; पर्यावरण प्रेमी नागरिकांनी दिला इशारा
By शेखर पानसरे | Published: June 14, 2023 03:11 PM2023-06-14T15:11:32+5:302023-06-14T15:12:27+5:30
यापुढे वाळू वाहतूक होत असलेल्या रिक्षा पेटविण्यात येतील. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. असा इशारा संगमनेरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी दिला आहे.
अहमदनगर - संगमनेरमधील प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत, कालबाह्य झालेल्या रिक्षांमधून वाळू वाहतूक केली जात होती. सोमवारी (दि. १४) गंगामाई घाट परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांच्या हे निर्देशनास आले, त्यांनी गोण्यांत भरलेली वाळू नदीपात्रात टाकून दिली, त्यानंतर रस्त्यावर वाळूच्या गोण्या पेटवून दिल्या.
गंगामाई घाट आणि परिसरातून अवैधरित्या सुरु असलेला वाळू उपसा कायमस्वरुपी बंद व्हावा. याकरिता आंदोलन देखील केले. मात्र, तरीही वाळू उपसा बंद होण्याकरिता प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे आज गोण्या पेटवून दिल्या, यापुढे वाळू वाहतूक होत असलेल्या रिक्षा पेटविण्यात येतील. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. असा इशारा संगमनेरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी दिला आहे.
प्रवरा, म्हाळुंगी नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा होतो आहे. पर्यावरणाचा ऱ्हास सुरू असून त्याबद्दल पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, त्याकडे महसूल, पोलिस प्रशासन गांभीर्याने पहायला तयार नाही. प्रवरा नदीपात्रातील गंगामाई व इतरही घाट परिसरातून दिवसाही अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे पुन्हा समोर आले. अवैधरित्या उपसा केलेली वाळू वाहण्यासाठी कालबाह्य झालेल्या रिक्षांचा वापर केला जातो आहे. यापूर्वीही याच परिसरातून अवैधरित्या वाळू उपसा करत कालबाह्य झालेल्या रिक्षांमधून वाळू वाहिली जायची. वाळू उपसा बंद होण्याकरिता नागरिकांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. परंतू पुन्हा तोच प्रकार सुरू झाल्याने पर्यावरण प्रेमी नागरिक आता अधिक आक्रमक झाले आहेत.