इथे सरकारी अधिकारीच देतात गर्भवतींना सिझेरियनचा सल्ला; घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयावर संतप्त महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 03:44 PM2017-11-24T15:44:52+5:302017-11-24T15:52:56+5:30
बाळ मृत झाले आहे, खासगी रुग्णालयात जाऊन सिझेरीयन करावे लागेल, असे सांगत चक्क वैद्यकीय अधिकारीच गरोदर महिलांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत, असा आरोप करीत शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयावर संतप्त महिलांनी मोर्चा काढला.
संगमनेर : बाळ मृत झाले आहे, खासगी रुग्णालयात जाऊन सिझेरीयन करावे लागेल, असे सांगत चक्क वैद्यकीय अधिकारीच गरोदर महिलांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत, असा आरोप करीत शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयावर संतप्त महिलांनी मोर्चा काढला.
संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी रूग्णालयावर मोर्चा नेत रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजीव घोडके यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. रूग्णालयाच्या कामकाजाबाबत सुधारणा न झाल्यास रास्ता रोको व उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला.
ग्रामीण रूग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या अनेक महिलांना बाळ पोटातच मृत झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर खासगी रूग्णालयात या महिलांचे बाळंतपण झाल्यानंतर बाळ सुखरूप असते. अनेक गर्भवती महिलांना सुलभ बाळंतपण होणार नसुन खासगी रूग्णालयात सिझेरीयन करण्याचा सल्ला येथे दिला जातो. मात्र, त्यानंतर खासगी रूग्णालयात त्या महिलांचे सुलभ बाळंतपण केले जाते. अशा अनेक धक्कादायक गोष्टी उपस्थित महिलांनी आंदोलनादरम्यान सांगितल्या.
तालुक्यातील गोरगरिब नागरिक या रूग्णालयात उपाचारांसाठी येतात. मात्र, रूग्णांना उपचारापूर्वीच गंभीर असल्याचे भासवत बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. रूग्णालयातील डॉक्टर व परिचारीका आपली जबाबदारी झटकत असून उपचारास अनेकदा टाळाटाळ होते. वैद्यकिय अधिका-यांचे रूग्णालयावर नियंत्रण राहिले नसल्याने असे प्रकार होत आहेत. दररोज रूग्ण व तेथील कर्मचा-यांमध्ये वादवादीचे प्रकार घडू लागले आहेत, असे आरोप आंदोलक महिलांनी केले. मोर्चात निर्मला गुंजाळ, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, नंदा बागुल, पंचायत समिती सदस्या सुनंदा जोर्वेकर, सुनिता कांदळकर, सुनिता अभंग सहभागी झाल्या.