रेशन घोटाळा अहवालाची लपवाछपवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 04:36 PM2018-06-16T16:36:50+5:302018-06-16T16:37:10+5:30
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या स्वस्त धान्य घोटाळ्याचा तपासणी अहवाल गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित आहे.
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या स्वस्त धान्य घोटाळ्याचा तपासणी अहवाल गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित आहे. तपासणी पूर्ण झाल्याचा दावा पारनेर तहसील कार्यालयाकडून केला जातो, परंतु अहवाल मात्र पुरवठा विभागाकडे आलेला नाही. पुरवठा विभागानेही या अहवालाच्या विलंबाबाबत विचारपूस केलेली नाही. त्यामुळे तहसील, तसेच पुरवठा विभागाच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होत आहेत.
नोव्हेंबर २०१७ मध्ये टाकळी ढोकेश्वर येथे स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी आलेले धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात आले. या प्रकारात तथ्य आढळल्याने पुरवठा विभागाने धान्य दुकानाचा परवाना निलंबित केला. हे दुकान गावच्या सोसायटीकडे चालवण्यास होते. त्याअंतर्गत टाकळी ढोकेश्वर व कासारे या दोन गावांतील सुमारे दीड हजार लाभार्थ्यांना धान्यपुरवठा होत होता. पुरवठा विभागाने पारनेर तहसील कार्यालयाला सूचना देऊन या घोटाळ्याची चौकशी सुरू केली. नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, मंडलाधिकारी, तलाठी यांनी या चौकशीअंतर्गत शंभर टक्के कार्ड तपासणी सुरू केली. परंतू गेल्या सात महिन्यांपासून ही तपासणीच पूर्ण होईना. याबाबत पारनेर तहसील कार्यालयात ‘लोकमत’ने मागील महिन्यात विचारणा केली असता, त्यांनी तपासणी पूर्ण झाली असून एक-दोन दिवसांत पुरवठा विभागाकडे अहवाल पाठवण्यात येईल, असे सांगितले. परंतु अद्याप हा अहवाल पुरवठा विभागाकडे गेलेला नाही.
जिल्ह्यात रेशन घोटाळ्याची शक्यता?
रेशनकार्डमध्येही जिल्ह्यात मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. टाकळी ढोकेश्वर येथे धान्य घोटाळा होऊनही तहसीलदारांकडून याची चौकशी पूर्ण होत नाही. तहसीलदारांकडून ही यंत्रणा दडपली जातेय का, असा प्रश्न उपस्थित झाला असून दुसरीकडे पुरवठा विभागही यात लक्ष घालायला तयार नाही. पुरवठा विभागाचा आदेशच तहसीलदारांकडून धाब्यावर बसवला गेला आहे. एका दुकानाच्या तपासणीसाठी जर सात महिने लागत असतील, तर यात काहीतरी काळंबेरं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, मंडलाधिकारी, तलाठी यांच्या पथकामार्फत टाकळी ढोकेश्वर येथील धान्य घोटाळ्याची कार्ड तपासणी केलेली आहे. परंतु या पथकाने तहसीलकडे अहवाल दिला की नाही याची विचारणा करते. पुरवठा विभागाकडे हा अहवाल गेलेला नसेल तर तातडीने पाठवला जाईल.
- भारती सागरे, तहसीलदार, पारनेर
टाकळी ढोकेश्वर येथील धान्य घोटाळ्याबाबत शंभर टक्के कार्ड तपासणी करण्याचे आदेश तहसील कार्यालयाला दिले होते. परंतु अद्याप त्यांचा अहवाल मिळालेला नाही. याबाबत चौकशी करून विलंबाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल.
- जितेंद्र इंगळे, सहायक पुरवठा अधिकारी