जिल्ह्यात २०२० मध्ये पोलिसांवर झाले सर्वाधिक हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:34+5:302021-01-10T04:15:34+5:30
लोकमत न्यजू नेटवर्क अहमदनगर : कर्तव्य निभावत असताना जिल्ह्यात २०२० या वर्षात तब्बल ११६ सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. ...
लोकमत न्यजू नेटवर्क
अहमदनगर : कर्तव्य निभावत असताना जिल्ह्यात २०२० या वर्षात तब्बल ११६ सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक हल्ले पोलीस तर त्या पाठोपाठ महसूल कर्मचाऱ्यांवर झाले आहेत. विशेष म्हणजे कोरोना काळात अशा स्वरूपाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली.
फ्रंटलाइन वर्कर अशी पोलीस दलाची ओळख आहे. कोरोनाकाळात महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. ऑन ड्यूटी असताना वर्षभरात ४१ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हल्ले झाले. मार्च ते जुलै असे साडेचार ते पाच महिने जिल्ह्यात लॉकडाऊन होते. या काळातही १८ पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. गुन्हेगारांवर कारवाई करत असताना, नियमांची अंमलबजावणी करताना तर कधी गैरसमजुतीतून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनंतर २८ महसूल विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. यामध्ये वाळूतस्कर आणि गौणखनिज तस्करांकडून सर्वाधिक हल्ले झाले आहेत.
वाळूतस्करांकडून सर्वाधिक हल्ले
जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांत महसूलसह पोलीस कर्मचाऱ्यांवर वाळूतस्करांनी सर्वाधिक हल्ले केले आहेत. कारवाईला गेल्यानंतर या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करून संघटित गुन्हेगारी करणाऱ्या बहुतांशी सराईत टोळ्यांवर तडीपारी, एमपीडीए व मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतुकीचे नियमन करताना तसेच सराईत गुन्हेगारांना अटक करताना पोलिसांवर हल्याच्या घटना घडत आहेत.
----------------------------------------------
महिना हल्ल्याच्या घटना
जानेवारी पोलीस-२ महसूल-४ इतर-७
फेब्रुवारी पोलीस- ७ महसूल-४ इतर-४
मार्च पोलीस- ३ महसूल-३ इतर-६
एप्रिल पोलीस- ५ महसूल-१ इतर-२
मे पोलीस- ६ महसूल-३ इतर-९
जून पोलीस- ३ महसूल-१ इतर-२
जुलै पोलीस- १ महसूल-४ इतर- ४
ऑगस्ट पोलीस- २ महसूल-० इतर- २
सप्टेंबर पोलीस- २ महसूल-५ इतर- १
ऑक्टोबर पोलीस- ४ महसूल-१ इतर-०
नोव्हेंबर पोलीस-४ महसूल-१ इतर -५
डिसेंबर पोलीस-२ महसूल-१ इतर- ५
२०२० या वर्षात झालेले हल्ले
पोलीस- ४१ महसूल- २८ इतर ४७.