टँकरने गाठला उच्चांक
By Admin | Published: May 2, 2016 11:23 PM2016-05-02T23:23:16+5:302016-05-02T23:32:45+5:30
अहमदनगर : उन्हाचा वाढलेला पारा, सर्वसामान्यांच्या घशाला पडलेली कोरड आणि वाड्या-वस्त्यांवरील आटलेले उद्भव, यामुळे जिल्ह्यातील टँकरने यंदा उच्चांक गाठला आहे़
दुष्काळदाह : ७१० टँकर, छावण्यांवर उड्या, १० हजार जनावरे छावणीत
अहमदनगर : उन्हाचा वाढलेला पारा, सर्वसामान्यांच्या घशाला पडलेली कोरड आणि वाड्या-वस्त्यांवरील आटलेले उद्भव, यामुळे जिल्ह्यातील टँकरने यंदा उच्चांक गाठला आहे़ जिल्ह्यातील पाचशे गावे आणि अडीच हजार वस्त्यांना ७१० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे़ याशिवाय जनावरांसाठी दहा छावण्या उघडण्यात आल्या आहेत़ या छावण्यांत दहा हजार जनावरे दाखल असल्याचे जिल्हाप्रशासनाने सांगितले़
जिल्हा भीषण दुष्काळाला सामोरा जात आहे़ उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे़ पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे़ शहरी व ग्रामीण भागासाठी प्रशासनाकडून ७१० टँकर सुरू करण्यात आले आहेत़ जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ४४१ गावे व २ हजार ४६६ वाड्या-वस्त्यांवरील ११ लाख २९ हजार ५२९ नागरिकांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी सध्या पुरविण्यात येते़ दक्षिण नगर जिल्ह्यासाठी कुकडी प्रकल्पातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे़ दक्षिणेतील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील कोरड्या पडलेल्या उद्भवांना पाणी आले आहे़ त्यामुळे टँकरचा प्रवास कमी होण्यास मदत झाली आहे़
उत्तर नगर जिल्ह्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ या भागातून आता टँकरची मागणी वाढली आहे़ जिल्ह्यात एप्रिलअखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध होता़ बहुतांश गावांतील चारा महिना अखेरीस संपला आहे़ त्यामुळे छावण्यांवर उड्या पडल्या आहेत़ जिल्हाभरातून ६७ प्रस्ताव प्रात झाले आहेत़ त्यापैकी २० छावण्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून, प्रत्यक्षात १० छावण्या सुरू झाल्या आहेत़ या छावण्यांत लहान व मोठी ९ हजार ४११ जनावरे दाखल झाली आहेत़ त्यात आणखी वाढ होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे़ जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहुरी वगळता उर्वरित तालुक्यांत टँकरची संख्या मोठी आहे़
(प्रतिनिधी)
कुठे किती टँकर :
संगमनेर-५८, अकोले-२, कोपरगाव-७, राहुरी-१, नेवासा-७७, राहाता-६, नगर-५६, पारनेर-७९, पाथर्डी-११४, शेवगाव-५७, कर्जत-८४, जामखेड-६०, श्रीगोंदा-५०, शहरी भागात-४.
मंजूर छावण्या:
जामखेड-३, कर्जत-३, नेवासा-४, नगर-११, पाथर्डी-१,शेवगाव-१.
गावपुढाऱ्यांची गर्दी
जनावरांच्या छावण्यांना मंजुरी मिळविण्यासाठी गावपुढाऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे़ काहींनी तर जिल्हाधिकारी कार्यालयातच तळ ठोकला आहे़ मंजुरीचे पत्र घेऊनच ते काढता पाय घेतात़
वाड्या-वस्त्यांवर ठणठणाट
गावे ओस पडली असून, वाड्या-वस्त्यांवर वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या वाढली आहे़ तालुकानिहाय टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या वस्त्या- संगमनेर-३२०, अकोले-१, कोपरगाव-२७, राहुरी-१, नेवासा-१२५, राहाता-३७, नगर-२४१, पारनेर-३०५, पाथर्डी-३६३, शेवगाव-२१९, कर्जत-३६४, जामखेड-११२, श्रीगोंदा-२९१.