सरकार नव्हे, हिंदू समाजच अयोध्येत राममंदिर उभारेल : मिलिंद परांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:14 PM2018-05-18T15:14:40+5:302018-05-18T15:14:57+5:30
अयोध्येतील राम मंदिर बनविण्यासाठी संघटनांचे काम सुरु आहे. याबाबत न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. एकूण पुराव्यांचा विचार केल्यास न्यायालय हिंदूच्या बाजून निकाल देईल अशी आशा वाटते.
अहमदनगर : अयोध्येतील राम मंदिर बनविण्यासाठी संघटनांचे काम सुरु आहे. याबाबत न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. एकूण पुराव्यांचा विचार केल्यास न्यायालय हिंदूच्या बाजून निकाल देईल अशी आशा वाटते. राम मंदिर कोणतेही सरकार बनवू शकत नाही. प्रत्यक्षात हिंदू समाजच मंदिर बनविणार असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रिय महासचिव मिलिंद परांडे यांनी केले. अहमदनगर येथील रेणाविकर विद्यालयात आयोजित महाराष्ट्र-गोवा राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्गासाठी परांडे आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर, वर्गप्रमुख गोविंदराव शेंडे उपस्थित होते.
परांडे म्हणाले, जो मंदिर बनविण्यासाठी विरोध करतो तो संपतो, असा इतिहास आहे. त्यामुळे सर्वांनी मदत करावी. राम मंदिर अयोध्येतील राम जन्माच्या भुमिवरच बनेल. त्या ठिकाणी कधीच मस्जिद बनू शकत नाही. हा नुसता हिंदू समाजा विषय नसून भारत देशाचा आहे. स्वाभिमानाचा, राष्ट्रहिताचा, देशभक्तीचा अन देशाचा सन्मानाचा हा विषय आहे. त्यामुळे लवकरच रामजन्मभुमिवर हिंदू समाज राम मंदिर उभारेल, असेही परांडे म्हणाले.
तर अन्य पक्षांनी मदत करावी
राम मंदिर उभारल्यानंतर भाजपाला निवडणुकीत फायदा होणार असे इतर पक्षांना वाटत असेल तर त्यांनी राष्ट्रवाद जपत राम मंदिर उभारण्यासाठी मदत करावी, असे प्रतिपादन परांडे यांनी केले.