तेची संत...तेची संत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 01:09 PM2020-03-01T13:09:57+5:302020-03-01T13:10:28+5:30
‘आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाशी, बोलीले जे ऋषी, साच भावे वर्ताया’. वरील अभंग प्रमाणांच्या माध्यमातून जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सकल संताच्या जीवन कार्याबाबत सांगतात.
अध्यात्म/राधेश्याम कुलकर्णी, अहमदनगर
‘आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाशी, बोलीले जे ऋषी, साच भावे वर्ताया’. वरील अभंग प्रमाणांच्या माध्यमातून जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सकल संताच्या जीवन कार्याबाबत सांगतात. संताचं भुतलावर येणं हे जडजीवांच्या उद्धारासाठी आहे. सामान्य लोकांना आपल्या आदर्श जीवन शैलीतून भक्ती मार्ग दाखवून नराचा नारायण करण्याचं सामर्थ्य संत संगतीत आहे. मात्र संत कोणाला म्हणायचं ? संताला कसं ओळखायच ? हा सामान्य जीवाला निर्माण होणारा प्रश्न आहे. त्याचंही उत्तर संत तुकाराम महाराज देतात. ‘तेचि संत तेचि संत, ज्यांचा हेतू विठ्ठले’ पांडुरंग सोडुन कोणताही हेतू उद्देश नसलेला महानुभाव म्हणजे संत. संत ओळखण्याची अनेक लक्षणे अनेक संतांनी अभंगात ग्रंथातून सांगितले आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत वर्णन करतात ‘तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद’ किंवा सहज बोलणे हितउपदेश,असे अनेक अभंग प्रमाण सांगता येतील. परंतु एवढं असुन आपल्या जवळ संत असुनही ते ओळखता येत नाहीत. मात्र त्याच जीवन कार्य संपून ते ईहलोक सोडतात. त्यानंतर उत्तरोत्तर त्यांची महती समाजासमोर येत रहाते. हे जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली ज्ञानदेवांदी संतांचे चरित्र पाहिल्यावर लक्षात येतं.