खर्डा लढाईचा नागलवाडीतील ऐतिहासिक तळ दुर्लक्षित; सीना नदीपात्रात सापडतात लढाईच्या खुणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 02:37 PM2020-01-19T14:37:01+5:302020-01-19T14:37:59+5:30
निजाम आणि पेशवे सैन्य यांच्यातील खर्डा लढाईचा नागलवाडीतील (ता. कर्जत) ऐतिहासिक तळ दुर्लक्षित आहे. पुरातत्त्व विभागासह इतिहास तज्ज्ञांकडूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे.
विनायक चव्हाण ।
मिरजगाव : निजाम आणि पेशवे सैन्य यांच्यातील खर्डा लढाईचा नागलवाडीतील (ता. कर्जत) ऐतिहासिक तळ दुर्लक्षित आहे. पुरातत्त्व विभागासह इतिहास तज्ज्ञांकडूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे.
खर्डा लढाई ही निजाम व पेशवे यांच्यात दोन वेळा झाली होती. परंतु, पहिली लढाई हरल्यानंतर पेशव्यांनी पुन्हा निजामावर चाल केली. यावेळी पेशव्यांच्या सैन्याचे सरसेनापती नानासाहेब फडणवीस होते. त्यांनी या खर्डा लढाईसाठी शिंदे, होळकर पवार या सेनापतींना या लढाईसाठी पाचारण केले. यावेळी कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथे पेशव्यांचे सरदार बांदल म्हणून होते. याच ठिकाणी पेशव्यांनी सैन्याचा तळ ठोकला होता. नागलवाडी ते खर्डा हे ४५ किलोमीटरचे अंतर आहे. नागलवाडी ते खर्डा किल्ल्यापर्यंत भुयार खोदण्यात आले होते. या भुयारातून शस्त्रसाठा पुरविला जात असे. याच लढाईत या खर्डा किल्ल्यावर रक्ताचे पाट वाहिल्याची इतिहासात नोंद आहे.
नागलवाडी येथूनच या लढाईसाठी शस्त्र पुरवठा केला गेला. नागलवाडी हे गाव श्रीमंताची वाडी म्हणून ओळखले जात असे. ज्या वाड्यात सैन्याचा तळ होता तो वाडा आज भंग्नावस्थेत आहे. पेशव्यांचे सरदार असलेल्या बांदल यांच्या वंशजाकडे हा वाडा आहे. या वाड्यात तीन भव्य भुयार असून, त्यांची पडझड झाली आहे. मोगलांच्या काळात जेव्हा तोफांचे बार या नागलवाडीच्या दिशेने उडवले जात असे. तेव्हा याच वाड्यात दोनशे बैलगाड्या, जनावरे व वाडीतील सर्व महिला या वाड्यातील भुयारात लपविण्यात आले होते. लढाईतील शस्त्रसाठा, धन, सैन्याची रसद याच वाड्यात ठेवली असल्याची माहिती काही वयोवृद्ध गावकरी सांगतात. नागलवाडी येथे सीना नदीपात्र विस्तीर्ण आहे. लढाईवेळी पायदळातील घोडे, हत्ती, उंट येथे ठेवले होते. येथे त्याच्याही काही खुणा आढळतात. वाळू उपसा करतेवेळी हत्तीला बांधून ठेवायचे साखळदंड सापडले आहेत. इतिहासात गाजलेल्या खर्ड्याच्या लढाईचा साक्षीदार हा वाडा आहे. याकडे सध्या पुरातत्त्व विभागासह इतिहास दुर्लक्ष झाले आहे.
अधिक संशोधन गरजेचे
खर्डा लढाईतला शस्त्रसाठा, धन, तसेच ऐतिहासिक दस्ताऐवज या ठिकाणी या वाड्याचे उत्खनन केले. तर मिळू शकतील, असे या गावक-यांचे म्हणणे आहे. या ठिकाणाचे संशोधन होऊन या ऐतिहासिक स्थळाचा विकास होणे गरजेचे आहे. मात्र याकडे पुरातत्त्व विभागासह इतिहासप्रेमींचेही दुर्लक्ष झाले आहे.