एचआयव्ही रुग्णांच्या हक्कांना कायद्याचे संरक्षण
By साहेबराव नरसाळे | Published: March 28, 2023 06:31 PM2023-03-28T18:31:08+5:302023-03-28T18:31:49+5:30
एचआयव्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७ हा एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे हक्क अबाधित ठेवून त्यांना सर्व सामान्यांसारखे जीवन जगण्यास सहाय्यकारी आहे.
अहमदनगर: एचआयव्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७ हा एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे हक्क अबाधित ठेवून त्यांना सर्व सामान्यांसारखे जीवन जगण्यास सहाय्यकारी आहे. या कायद्यामुळे एचआयव्ही एड्स बाधितांच्या मुलभूत हक्कांचे संरक्षण होत आहे, असे सरकारी वकील व विधी सल्लागार ॲड. अनिल सरोदे यांनी सांगितले.
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात एचआयव्ही एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) कायदा २०१७ बाबत जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे ॲड. सुनील मुंदडा, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सरोदे म्हणाले, एचआयव्ही एड्स कायद्याबाबत जनजागृती आवश्यक आहे. कायदे हे लोकांसाठीच असतात.
कायद्यामुळे लोकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण होते. त्याचबरोबर जबाबदारी व कर्तव्याची जाणीव सुद्धा कायद्याद्वारे केली जाते. त्यामुळे ज्यांच्यासाठी कायदे तयार होतात, त्यांना त्याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. एचआयव्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७ हा एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे हक्क अबाधित ठेवून त्यांना सर्व सामान्यांसारखे जीवन जगण्यास सहाय्यक आहे. त्याचप्रमाणे कायद्याच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व संबंधितांना जबाबदारी व कर्तव्याची जाणीव याद्वारे केली जाते.
जिल्ह्यातील आयसीटीसी, एआरटी, संपूर्ण सुरक्षा केंद्र, विहान प्रकल्प, प्रकल्प समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका व इतर कर्मचारी, संस्था प्रतिनिधी आदींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचालन नवनाथ लोखंडे यांनी केले. आभार प्रशांत येंडे यांनी मानले.