हिवरेबाजार होणार अहमदनगर जिल्ह्यातील पहिले कोरोनामुक्त गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 06:56 PM2021-05-08T18:56:55+5:302021-05-08T18:58:17+5:30
आदर्शगाव हिवरेबाजार १५ मे रोजी कोरोनामुक्त होणार आहे. या गावात दोन महिन्यांत ५० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यावेळी लक्षणे असलेल्या नागरिकांची त्वरित कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त होत आहे.
अहमदनगर : आदर्शगाव हिवरेबाजार १५ मे रोजी कोरोनामुक्त होणार आहे. या गावात दोन महिन्यांत ५० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यावेळी लक्षणे असलेल्या नागरिकांची त्वरित कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त होत आहे. पद्मश्री पोपटराव पवार हे ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर देत असल्याने रुग्णांचेही मनोबल वाढले आहे.
अहमदनगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये एप्रिल व मे महिन्यात एकूण ५० व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्या होत्या. त्यापैकी ३२ रुग्ण गावातील होते तर १८ रुग्ण हे हिवरेबाजार येथील रहिवासी परंतु कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यातील २ व्यक्तींचा मृत्यू झाला तर ५ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. यशवंत कृषी ग्राम व पाणलोट विकास संस्थेच्या हिवरेबाजार प्रशिक्षण केंद्रावरील विलगीकरण कक्षात २५ रुग्णांना ठेवण्यात आले होते. तर १८ रुग्ण हे स्वत:च्या घरीच अलगीकरणात होते. सध्या गावात फक्त १ रुग्ण सक्रिय असून, तो नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. १५ मे २०२१पर्यंत हिवरे बाजार गाव कोरोनामुक्त गाव करण्याचा संकल्प ग्रामपंचायत हिवरेबाजार, कोरोना समिती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, हिवरेबाजार, यशवंत कृषी ग्राम व पाणलोट संस्था, ग्रामस्थ व स्वयंसेवक यांनी केला आहे. यासाठी मुंबादेवी सहकारी दूध उत्पादक संस्था, वाहतूक करणारे गाडीमालक, किराणा दुकानदार, प्राथमिक शाळा हिवरेबाजार, शिक्षक, यशवंत माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक या सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केले. तसेच उपाययोजना राबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. शिवानी देशपांडे व त्यांचे सर्व सहकारी, टाकळी खातगावचे डॉ. शंकर केदार, डॉ. राऊत, तलाठी संतोष पाखरे, ग्रामसेवक सचिन थोरात, डॉ. योगेश पवार, डॉ. सुशील पादीर, सरपंच विमल ठाणगे, विजय ठाणगे, दीपक ठाणगे यांचे सहकार्य मिळाले.
गावात स्वयंसेवकांची पथके
सध्या शेतीची कामे जोरात सुरु असल्यामुळे शेतात काम करण्यासाठी बाहेरुन कोकण, विदर्भ व परिसरातील जवळपास ३०० शेतमजूर येतात. या सर्वांची वेळेवर तपासणी, शेतात विलगीकरणामुळे त्यांचा कुटुंबाशी संपर्क येत नाही. यासाठी गावातील स्वयंसेवकांची ४ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक आठवड्याला ऑक्सिजन व तापमान तपासणी करण्यात येते. त्यानुसार नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. त्यात एखादा संशयित आढळल्यास त्याची लगेच टाकळी खतगाव व हिवरे बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना चाचणी करण्यात येते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेत उपचाराचे धोरण घेऊन व प्रशिक्षण केंद्रावर रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. संक्रमित रुग्णांची प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांमार्फत दिवसातून दोनवेळा तपासणी करण्यात येते. गावातील ४ वाहने ही कोविड संक्रमित रुग्णांची तपासणी व उपचारासाठी ठेवण्यात आली आहेत. या सर्व उपायांमुळे रुग्ण चिंतामुक्त, कोरोनामुक्त होत आहेत, असे पोपटराव पवार यांनी सांगितले.
संवादाने वाढले मनोबल
पद्मश्री पोपटराव पवार हे दररोज गावातील २५ कुटुंबांना भेट देऊन चर्चा करतात. तसेच प्रशिक्षण केंद्रातील विलगीकरण कक्षाला सकाळी व संध्याकाळी भेट देऊन कोरोनाबाधित रुग्णांशी चर्चा करतात. स्वत:च्या घरी अलगीकरणत असलेल्या रुग्णांना एकवेळ भेटून चर्चा करतात. तसेच हॉस्पिटलमधील रुग्णांशीही दूरध्वनीवर बोलतात. संबंधित डॉक्टरांशी बोलल्यामुळे रुग्णांचे मनोबल वाढते व मनातील भीती दूर होते. ग्रामपंचायतीने ऑक्सिमीटर, हॅण्डग्लोव्हज्, आयपॅड, सॅनिटायझर, ई-सुविधा उपलब्ध केल्यामुळे कर्मचारी व स्वयंसेवक बाधित झालेले नाहीत. तसेच कोविड रुग्णांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांची विशेष काळजी घेतली जाते.