ताण हलका करण्यासाठी ‘खाकी’मध्येही जोपासला जातोय छंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:00+5:302021-05-10T04:20:00+5:30
अहमदनगर : ‘आवड असेल तर सवड मिळते’ अशी एक म्हण प्रचलित आहे. सध्याच्या कोरोना महामारीत बारा ते सोळा तासांची ...
अहमदनगर : ‘आवड असेल तर सवड मिळते’ अशी एक म्हण प्रचलित आहे. सध्याच्या कोरोना महामारीत बारा ते सोळा तासांची ड्युटी केल्यानंतरही काही पोलीस कर्मचारी आपला छंद जोपासून कामाचा ताण हलका करत आहेत.
छंदातूनच निर्माण झालेली ही कला इतर पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी आहे. जिल्हा पोलीस दलात असे अनेक कलाकार दडलेले आहेत. यातील कुणी गायनाचा छंद जोपासला आहे तर कुणी विविध प्रकारची वाद्य वाजवतात, काहीजण उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत तर काही लघुपट निर्मितीसारखे अवघड कामही लिलया करताना दिसतात. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी नियमित व्यायामाचा छंद जोपासून आपल्या सहकाऱ्यांना सुदृढ आरोग्याची प्रेरणा दिली आहे.
.......
पोलीस दलात रुजू होण्याआधी गावाकडे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम करणाऱ्या पथकांमध्ये मी गीतगायन करायचो. यातूनच गायनाची आवड निर्माण झाली. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील वर्षी कोरोनासंदर्भात जनजागृती करणाऱ्या एका गाण्याची निर्मिती केली. ‘यू ट्यूब’वर हे गाणे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरले आहे. कामातून वेळ काढून गाणे शिकत असून, शास्त्रीय संगीताची एक परीक्षाही उत्तीर्ण झालो आहे. गीत गायनातून मनाला प्रसन्न वाटते तसेच समाजप्रबोधनपर संदेशही देता येतो.
- सतीश वाकडे, पोलीस कॉन्स्टेबल
.........
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. मला लहानपणापासून भजन-कीर्तन व सुगम संगीताची आवड आहे. पोलीस दलात रुजू झाल्यानंतरही सवड मिळेल, तशी ही आवड जोपासली आहे. कीर्तनात अभंग गायन, चाल म्हणणे, हार्मोनियम वाजवणे ही कला आत्मसात केली आहे. या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचेही काम करतो. ही आवड जोपासल्याने मनाला आत्मिक समाधान मिळते. काम करण्यासही ऊर्जा मिळते, मन हलके होते.
- विलास लोणारे, पोलीस हवालदार
........
महाविद्यालयीन जीवनापासून लघुपट निर्मितीची आवड निर्माण झाली. २०१४पर्यंत १६ लघुपट तयार केले. यातील अनेक लघुपटांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. पोलीस दलात रुजू झाल्यानंतरही ही आवड कायम ठेवली आहे. ह्युमन सायकॉलॉजी, महिला व लहान मुलांचे प्रश्न, समाजातील वंचितांचे प्रश्न या लघुपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये कथा लेखन, दिग्दर्शन व छायाचित्रण अशा सर्व जबाबदाऱ्या मी निभावतो. हा छंद जोपासल्याने एक वेगळेच समाधान मिळते. हे करत असताना फोटोग्राफीचाही छंद जोपासला आहे.
- अरुण सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल
..............................
शरीर निरोगी आणि सुदृढ असेल तर आपण कुठल्याही आव्हानांचा सामना करू शकतो. २००८पासून व्यायामाचा छंद जोपासला असून, यात कधीही खंड पडू दिला नाही. दररोज सकाळी सात ते साडेआठ जीममध्ये वर्कआऊट केल्यानंतरच माझ्या दिवसाची सुरुवात होते. सध्या लॉकडाऊनमुळे जीम बंद असल्याने मी घरीच व्यायाम करतो. नियमित व्यायामाने मन प्रसन्न राहते, कामाचा ताण हलका होतो अणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीर निरोगी राहते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रत्येकाने नियमित व्यायाम करावा.
- योगेश गोसावी, पोलीस हेडकॉन्स्टेबल
..........................
जिल्ह्यातील एकूण पोलीस कर्मचारी - २,९२६
एकूण पोलीस अधिकारी - १६२