इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक घ्या, रणनिती ठरवा; भाकपची शरद पवार यांच्याकडे मागणी
By अरुण वाघमोडे | Published: January 8, 2024 05:09 PM2024-01-08T17:09:58+5:302024-01-08T17:10:49+5:30
भाकपच्या शिष्टमंडळाने सोमवारी पवार यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे पत्र त्यांना सुपूर्त केले.
अहमदनगर/शेवगाव: भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी. तसेच राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनिती आखणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
भाकपच्या शिष्टमंडळाने सोमवारी पवार यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे पत्र त्यांना सुपूर्त केले. शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ प्रकाश रेड्डी, मुंबई सेक्रेटरी कॉ. मिलिंद रानडे व राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. अशोक सुर्यवंशी यांचा सहभाग होता.
या पत्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे, की भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष या आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची एकत्रित बैठक होणे आवश्यक आहे. भाकपने महाराष्ट्रात परभणी व शिर्डी अशा लोकसभेच्या दोन जागा लढविण्याची तयारी केली आहे. भाकपने परभणीतून कॉ. राजन क्षीरसागर व शिर्डीतून कॉ.ॲड. बन्सी सातपुते यांचे नाव निश्चित केले आहे.
भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी. आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचा पराभव करू शकतात असा संदेश जनतेपर्यंत जाणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व घटक पक्षांची तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी पवार यांनी आठवड्याभरात राज्यातील इंडिया आघाडीतील घटकपक्षांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचे सांगून, या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षासह अन्य डाव्या पक्षांना निमंत्रण देणार असल्याचे सांगितले.