लाडके जावईबापू 'लटकले', बाकी सगळे 'सटकले'; धुळवडीला गाढवावरून वाजतगाजत मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:21 AM2023-03-09T11:21:36+5:302023-03-09T11:24:22+5:30
पिढ्यान् पिढ्या गाढवावरून जावयाची धिंड काढण्याची खंडित पडलेली बारागाव नांदूर येथील परंपरा चार वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क राहुरी : पिढ्यान् पिढ्या गाढवावरून जावयाची धिंड काढण्याची खंडित पडलेली बारागाव नांदूर येथील परंपरा चार वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली. धूलिवंदनाचे औचित्य साधून बारागाव नांदूर येथील राजेंद्र कांदळकर या जावयाची वाजतगाजत गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. अन्य जावई दोन-तीन दिवसांपासून गावातून पळून गेले. यामुळे एकमेव कांदळकर यांची मिरवणूक काढली.
बारागाव नांदूर येथील रखमाजी वाघ यांचे जावई राजेंद्र कांदळकर हे बारागाव नांदूर येथे राहतात. कांदळकर यांना सापळा रचून मित्र व नातेवाइकांनी पकडले. त्यांच्या अंगावर रंगाची उधळन केली.बारागाव नांदूर परिसरात बँड पथकाच्या निनादात धिंड काढली. धिंड सासरे रखमाजी वाघ यांच्या घरी गेली. मुळा धरणाच्या पायथ्यापासून मिरवणुकीस सुरुवात झाली. सासुरवाडीला जावयाला नवीन कपड्यासह पंचपक्वानाचे जेवण देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोनामुळे चार वर्षे जावयाची धिंड काढण्याची प्रथा बंद पडली होती. यंदाही जावयाची धिंड निघणार म्हणून बारागाव नांदूर परिसरातील इतर दावई हाती लागू शकले नाहीत.
कांदळकर यांना मित्र व नातलग रियाज इनामदार, राजेंद्र वाघ, लक्ष्मण वाघ, शरद वाघ, शिवाजी, भालेराव आदींनी पकडून मिरवणूक काढली.
५० वर्षांपासूनची प्रथा जपली
बारागाव नांदूर गावाने गेल्या ५० वर्षांपासून जावईबापूच्या धिंडीची प्रथा जपली आहे. कोरोना कालखंडात ही प्रथा बंद पडली होती. परंतु गावातील तरुणांनी प्रथा बंद पडू न देता वाघ यांचे जावई कांदळकर यांना अखेर शोधलेच.
मिरवणुकीचा मनात कुठलाच राग नाही. मित्रांनी नातलगांनी गाढवावरून मिरवणूक काढली. शेवटी वाघ कुटुंबीयांनी जावई म्हणून मला मान दिला.
- राजेंद्र कांदळकर. जावई.