आग लागू बेघर झालेल्या कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:47+5:302021-04-13T04:19:47+5:30
मागील बारा दिवसापूर्वी कोंभाळणे येथील चार आदिवासी ठाकर कुटुंबीयांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि ही चारही कुटुंब बेघर ...
मागील बारा दिवसापूर्वी कोंभाळणे येथील चार आदिवासी ठाकर कुटुंबीयांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि ही चारही कुटुंब बेघर झाली होती. या चारही कुटुंबांना अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. कुणी अन्नधान्य तर कोणी इतर साहित्य दिले. शासनाने ही पंचनामा करत मदत देण्याचे जाहीर केले. मात्र सरकारी काम आणि चार दिवस थांब या म्हणीप्रमाणे कागदपत्रे फिरत आहे. अन्नधान्याची सोय झाली होती. मात्र या बेघर कुटुंबांना निवारा आवश्यक होता. ही बाब पिचड आणि वीरगाव येथील स्वर्गीय आनंद दिघे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अमृत सागर दूध संस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी हेरली. पिचड यांच्या सूचनेनुसार वाकचौरे यांनी या अपघातग्रस्त कुटुंबांना एकूण ८०० चौरस फुटाची लोखंडी शेड पाडव्यापर्यंत उभी करू, असा मानस व्यक्त केला.
त्यादृष्टीने रावसाहेब वाकचौरे यांनी नियोजन करत या चारही कुटुंबांना हक्काचा निवारा उभारून दिला. गुढीपाडव्याच्या दिवशी संसार उपयोगी साहित्य, कपडे देऊन पिचड यांच्या हस्ते गुढी उभारून या कुटुंबाला गोड जेवण देण्यात येणार आहे.
पिचड यांनी या अगोदर २१ हजार रूपये रोख, ताडपत्री, किराणा व धान्य दिलेले आहे. नंतर वाकचौरे व त्यांच्या मित्रमंडळाने हक्काचा निवारा उभा केला. यात वीरगावचे उपसरपंच संजय थोरात, दत्ता भागडे, शांताराम तोरमल यांनी सहकार्य केले.