बेघर कुटुंबाचा हक्काच्या घरात पहिल्यांदाच गृहप्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:22 AM2021-03-09T04:22:32+5:302021-03-09T04:22:32+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी ग्रामपंचायतीने महिला दिनाचे औचित्य साधून घरकुल योजनेत मिळालेल्या घरांचे सोमवारी (दि. ८) महिला सरपंचांच्या ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी ग्रामपंचायतीने महिला दिनाचे औचित्य साधून घरकुल योजनेत मिळालेल्या घरांचे सोमवारी (दि. ८) महिला सरपंचांच्या हस्ते उद्घाटन करून गृहप्रवेशाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. याद्वारे अनेक वर्षांपासून किरायाच्या घरात राहणाऱ्या एका बेघर कुटुंबाला पहिल्यांदाच हक्काच्या घरात प्रवेश मिळाला.
पिंगेवाडी येथील महिला सरपंच मंगल अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते सोमवारी महिला दिनानिमित्त घरकुल योजनेतंर्गत बांधलेल्या कमल राजेंद्र क्षीरसागर व दिलीप शंकर अंगरख यांच्या घरकुलांचे उद्घाटन करून गृहप्रवेश सोहळा पार पडला. यानिमित्ताने येथील कमल राजेंद्र क्षीरसागर यांच्या कुटुंबाला पहिल्यांदाच हक्काच्या घरात प्रवेश मिळाला. येथील रहिवासी असलेले राजेंद्र क्षीरसागर हे भूमिहीन असून सलून व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर पत्नी कमलबाई या लोकांच्या शेतात मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवतात. मागील १५-२० वर्षांपासून ते गावातच एका खासगी मालकीच्या घरात किरायाने राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी गावात बांधकामापुरती जागा खरेदी करून त्याठिकाणी घरकुल योजनेत मिळालेल्या घराचे बांधकाम पूर्ण केले. तसेच दिलीप शंकर अंगरख यांनाही हक्काचा निवारा नव्हता. महिलादिनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांला त्यांच्या हक्काच्या घरात प्रवेश करून ताबा देण्यात आला.
यावेळी सरपंच मंगल जाधव, ग्रामसेवक सुनील राठोड, ग्रामपंचायत सदस्य तथा सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख, सचिन जाधव, रामा शेलार, किशोर अंगरख, गुलबस घुले, विकास अंगरख, सोना पांडुळे, लखन अंगरख, भीमा मुंढे, अण्णासाहेब अंगरख, ग्रामपंचायत कर्मचारी रवी नागरे आदी उपस्थित होते.
--
०८ पिंगेवाडी
पिंगेवाडी येथे महिला दिनानिमित्त महिला सरपंच मंगल आण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते घरकुलांचे उद्घाटन करून गृहप्रवेश उपक्रम राबविण्यात आला.