निराधार महिलांना मिळणार रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:17 AM2021-05-31T04:17:16+5:302021-05-31T04:17:16+5:30

जामखेड : कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे कोरोनाची लागण होऊन निधन झाल्यामुळे निराधार बनलेल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील महिलांच्या कुटुंबांचा रोजगाराचा ...

Homeless women will get employment | निराधार महिलांना मिळणार रोजगार

निराधार महिलांना मिळणार रोजगार

जामखेड : कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे कोरोनाची लागण होऊन निधन झाल्यामुळे निराधार बनलेल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील महिलांच्या कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सोडविला जाणार आहे. कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या ‘आधार’ या उपक्रमाद्वारे निराधार महिलांना स्वयंरोजगार साहाय्य, प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

चोंडी (ता. जामखेड) येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, कोरोनाच्या या वैश्विक संकटात कर्जत व जामखेड तालुक्यातील अनेकांच्या घरातील कमावत्या व्यक्तींचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे अनेक महिला तसेच घरातील वयोवृद्ध व्यक्ती निराधार बनल्या. अशावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून एक सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना शिलाई मशीन व पीठ गिरणी किंवा इतर छोटा घरगुती उद्योग मिळाल्यास त्यांची रोजगाराची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. तसेच महिला स्वावलंबी होऊन सक्षमीकरणाचा उद्देश साध्य होईल, या दृष्टिकोनातून ‘आधार’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. स्वयंरोजगार निर्मितीसाठी स्वतः त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ही योजना राबवणार असून याविषयीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन हे कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेतर्फे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच कर्जत-जामखेडमधील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत ''काळी बुरशी'' म्युकरमायकोसिसबाबत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे ६ जूनरोजी कर्जत येथे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी चिमण डांगे, युवा नेते अक्षय शिंदे, सुनील उबाळे आदी उपस्थित होते.

-----

कुटुंबातील निराधार महिलांच्या हाताला काम मिळून त्यांचा रोजगाराचा प्रश्न दूर व्हावा याकरिता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत निराधार महिलांकरिता ‘आधार’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या महिलांना स्वावलंबी करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वतोपरी रोजगार साहाय्य करण्यात येणार आहे.

- रोहित पवार,

सदस्य, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ

Web Title: Homeless women will get employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.