श्रीमंत व्यक्तीला ब्लॅकमेल करणाऱ्या हनीट्रॅपचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:35+5:302021-05-16T04:19:35+5:30
नगर तालुक्यातील जखणगाव येथे ३० वर्षीय आरोपी महिला एकटीच राहते. तिने नगर तालुक्यातील एका श्रीमंत व्यावसायिकास शरीरसंबंधाचे आमिष दाखवून ...
नगर तालुक्यातील जखणगाव येथे ३० वर्षीय आरोपी महिला एकटीच राहते. तिने नगर तालुक्यातील एका श्रीमंत व्यावसायिकास शरीरसंबंधाचे आमिष दाखवून २६ एप्रिल रोजी घरी बोलाविले. यावेळी सदर व्यावसायिकास शरीरसंबंध करण्यास भाग पाडून अमोल मोरे यांच्या मदतीने त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. व्हिडिओ तयार होताच आरोपींनी आम्हास एक कोटी रुपये आणून दे नाहीतर सदर व्हिडिओ हा पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. यावेळी आरोपींनी त्या व्यावसायिकास दोरीने बांधून मारहाण करून त्याच्याकडील ५ तोळे वजनाची सोन्याची चेन, चार अंगठ्या व रोख रक्कम ८४ हजार रुपये असा एकूण ५ लाख ४४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. या घटनेनंतर घाबरून गेलेल्या सदर व्यावसायिकाने सुरुवातीस मौन बाळगले; मात्र सदर महिलेचा त्रास असह्य झाल्यानंतर त्याने नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर सानप यांच्या पथकाने शनिवारी सकाळीच जखणगाव येथून सदर महिलेला अटक केली तर अमोल मोरे याला कायनेटिक चौक येथून त्यांच्या राहत्या घरातून अटक करत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
सदर महिलेने व्यावसायिकाकडून हिसकावून घेतलेली चेन तिने भिंगार अर्बन बँक येथे तिच्या भावाच्या नावाने गहाण ठेवली होती. झडती दरम्यान पोलिसांनी सदर महिलेच्या घरातून गुन्ह्यातील एक अंगठी व रोख ६९ हजार ३०० रुपये जप्त केले आहेत. तसेच अमोल मोरे याच्याकडून १५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व पथकातील उपनिरीक्षक आर.एन. राऊत, हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे, भगवान गांगडे, शैलेश सरोदे, संतोष लगड, योगेश ठाणगे, अशोक मरकड, धर्मनाथ पालवे, प्रमिला गायकवाड, धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे, गायत्री धनवडे, मोहिनी कर्डक, राजश्री चोपडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
..........
महिलेच्या जाळ्यात अनेक जण अडकल्याची शक्यता
सदर महिला व तिचा साथीदार अमोल मोरे यांनी हनीट्रॅपच्या माध्यमातून अनेकांना ब्लॅकमेल करून पैसे लाटल्याचा पोलिसांचा संशय आहे. अशा पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी भीती न बाळगता नगर तालुका पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे.