निघोज परिसराला पावसाची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:22 AM2021-07-30T04:22:02+5:302021-07-30T04:22:02+5:30
निघोज : पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन आदी पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे निघाेज (ता. पारनेर) परिसरातील ...
निघोज : पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन आदी पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे निघाेज (ता. पारनेर) परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची आस लागली आहे.
हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर सतत पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन पेरणीला उशीर झाला. त्यानंतर पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र आता पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने सोयाबीन, बाजरी, तूर आदी पिके सुकू लागली आहेत. एकीकडे कोकण, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे पावसाने धुमाकूळ घातला आहे. इकडे मात्र पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत.
निघोज, रेनवडी, देविभोयरे, वडनेर बुद्रूक परिसरात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पेरणी झाली. त्यातच उगवून आलेली पिके पावसाअभावी संकटात सापडली आहेत. येत्या आठ दिवसांत पाऊस न झाल्यास पिके जळून जातील. शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगामच वाया जाईल.
---
दुबार पेरणी करूनही संकट...
अगोदरच यंदा पावसाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातच आता पावसाअभावी पेरणी उशिरा झाली. आठ दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, असे शेतकरी संकेत लाळगे, गुलाब पठारे, दत्ताजी लंकेल, विश्वासराव शेटे यांनी सांगितले.
----
२९ निघोज पिके