घोड धरण ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:46 PM2018-08-23T12:46:11+5:302018-08-23T12:46:31+5:30
श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ५० गावांना वरदान ठरणारे घोड धरण बुधवारी ओव्हरफ्लो झाले. ५० वर्षांमध्ये हे धरण ४१ वेळा भरले आहे.
श्रीगोंदा : श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ५० गावांना वरदान ठरणारे घोड धरण बुधवारी ओव्हरफ्लो झाले. ५० वर्षांमध्ये हे धरण ४१ वेळा भरले आहे. धरणातून १० हजार ४४० क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
घोड नदीवर १९६५ च्या सुमारास ७ हजार ६३८ दशलक्ष घनफू ट क्षमतेचे मातीचा भराव असलेले २९ दरवाजे असलेले हे धरण चिंचणी येथे बांधण्यात आले. या धरणास ३२ किलोमीटर लांबी असलेला उजवा तर ८६ किलोमीटर लांबीचा डावा कालवा आहे. धरणातून १९६८ ला शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले. सन १९६८ ते २०१८ दरम्यान ५० वर्षे पूर्ण केल्याने हे धरण यावर्षी अर्ध शतक साजरे करीत आहे. यामध्ये ४१ वेळा धरण ओव्हरफ्लो झाले. यामध्ये १९७१ व १९८३ ला घोड धरणातून एक लाख क्यूसेसपेक्षा जादा पाणी घोड नदीत सोडण्यात आले. त्यामुळे काष्टी, गावठाण परिसरात राहणाऱ्या सुमारे चारशे कुटूंबांचे स्थलांतर करावे लागले होते.
या धरणातील पाणी साठ्यावर तयार झालेल्या उसावर नागवडे, घोडगंगा व अंबालिका या तीन साखर कारखान्यांचे चक्र फिरले आहे. साखर उद्योगाच्या माध्यमातून या भागाच्या विकासाला दिशा मिळाली आहे. घोड धरण १०० टक्के भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांनी जल्लोष केला आहे.
कुकडी धरण ८० टक्के भरले
कुकडी प्रकल्पातील डिंबे वडज व येडगाव धरण १०० भरले आहे. माणिकडोह ६६ टक्के, तर पिंपळगाव जोगे धरण ४७ टक्के भरले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा कुकडी प्रकल्पात २ टक्के जादा उपयुक्त पाणी साठा आहे.
घोड नदीकाठी सावधगिरी
डिंभे, येडगाव, वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. घोड धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. बुधवारी सकाळी घोड धरण ओव्हरफ्लो झाले. नदीत सोडण्यात येणा-या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. वरच्या भागातून जादा पाणी आले तर, घोड धरणातून आणखी पाणी सोडावे लागेल. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन शिरूरच्या घोड पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश लंकेश्वर यांनी केले आहे.