बिलाच्या मागणीसाठी शेवगाव नगरपालिकेत घुसवला घोडा
By Admin | Published: May 11, 2017 05:24 PM2017-05-11T17:24:12+5:302017-05-11T17:24:12+5:30
शेवगाव नगरपरिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात घोड्याला नेण्यात आले. तिथेच त्यांनी ठिय्या दिला.
आॅनलाइन लोकमत
शेवगाव (अहमदनगर) दि़ ११ - शेवगाव नगरपरिषदेमार्फत केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम मिळावी, या मागणीसाठी भाकपचे युवा कार्यकर्ते कॉ. संजय नांगरे, चंद्रभान नांगरे यांनी घोड्यासह नगरपरिषदेच्या दालनात गुरुवारी अनोखे बिल मागणी आंदोलन केले. नांगरे बंधुंनी केलेले हे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले.
शेवगाव नगरपरिषदेने परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत चंद्रभान भगवान नांगरे यांनी नगरपरिषदेची निविदा दाखल केली होती. ती मंजूर झाल्यानंतर नांगरे यांनी घोड्यावर बसून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे ६० दिवस काम केले. या कामाच्या बिलाची रक्कम वारंवार मागणी करूनही न दिल्याने संजय नांगरे व त्यांचा भाऊ चंद्रभान यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात घोड्यासह बिल मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्धार जाहीर केला होता. मात्र या इशाऱ्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारी शेवगाव नगरपरिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात घोड्याला नेण्यात आले. तिथेच त्यांनी ठिय्या दिला. घोड्याला जिन्यातून दुसऱ्या मजल्यावर नेताना आंदोलनकर्त्यांची एकच धांदल उडाली. या आंदोलनाची शेवगावात रंगतदार चर्चा झडली.
नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुधा कुरणावळ यांनी येत्या आठवडाभरात निर्णायक कार्यवाही करण्याचे मान्य केल्यानंतर तब्बल तासभर सुरु असलेले हे अनोखे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी कुरनावळ यांनी याबाबत तातडीने दखल घेण्याचे मान्य केल्या नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.