हॉस्पिटलकडून अडवणूक; भरपाईचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 03:32 PM2019-08-28T15:32:21+5:302019-08-28T15:33:36+5:30
वैद्यकीय उपचारासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतानाही कागदपत्रांची पूर्तता न करता उपचाराचे रुग्णाकडून पैसे घेत अडवणूक केल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण
अहमदनगर: वैद्यकीय उपचारासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतानाही कागदपत्रांची पूर्तता न करता उपचाराचे रुग्णाकडून पैसे घेत अडवणूक केल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने श्री साई सह्याद्री मल्टी स्पेशालिटी या रुग्णालयाने रुग्णास ४७ हजार ५०० रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत़
ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही़सी़ पे्रमचंदाणी, सदस्य सी़व्ही़ डोंगरे व एम़एऩ ढाके यांनी हा निकाल दिला आहे़ या प्रकरणात तक्रारदार यांच्यावतीने अॅड़ एस़एल़ असावा यांनी काम पाहिले़ नगर तालुक्यातील पोखर्डी येथील गोरक्षनाथ मुरलीधर चौरे यांचे वडील मुरलीधर केशव चौरे यांना मेंदुमध्ये रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना उपचारासाठी येथील झोपडी कॅन्टीनजवळील श्री साई सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबर २०१४ मध्ये दाखल केले़ चौरे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्यावर राजीव गांधी जीवनदायी योजनेतंर्गत उपचार करावे अशी विनंती हॉस्पिटलचे डॉ़ अतुल विजयकुमार गुगळे व व्यवस्थापक राजेंद्र पुंजाजी पगार यांना केली होती़ तसेच योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे चौरे यांनी हॉस्पिटलकडे दिले होते़ उपचार झाल्यानंतर हॉस्पिटलने चौरे यांचे प्रकरण राजीव गांधी योजनेकडे सादर केले नाही व त्यांच्याकडून उपचाराचा खर्च घेतला़ याबाबत गोरक्षनाथ व मुरलीधर चौरे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे हॉस्पिटल, डॉक्टर व व्यवस्थापकाविरोधात तक्रार दाखल केली होती़ यावर सुनावणी होऊन मंचाने हॉस्पिटल, डॉ़ अतुल गुगळे व व्यवस्थापक पगार यांनी तक्रारदार चौरे यांना ४७ हजार ५०० रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत़ आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नुकसान भरपाई दिली नाही तर दरसाल दर शेकडा ९ टक्के व्याज देण्याचे आदेश मंचाने दिले आहेत़
हॉस्पिटलविरोधात तीन ठिकाणी तक्रारी
तक्रारदार चौरे यांनी श्री साई सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलविरोधात ग्राहक मंचासह राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा प्रमुख यांच्याकडे तक्रार केली होती़ या तक्रारीत तथ्य आढळल्याने या हॉस्पिटलचे नाव राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी पात्र असलेल्या हॉस्पिटलच्या यादीतून वगळण्यात आले आहे़ चौरे यांनी इंडियन मेडिकल कौन्सिलकडेही तक्रार केली होती़ त्यांच्याकडे याबाबत अद्याप चौकशी सुरू आहे़