बाहेरून चकाचक दिसणारे हाॅटेल औरस तर आतून प्रचंड घाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:21 AM2021-04-01T04:21:16+5:302021-04-01T04:21:16+5:30
अहमदनगर : बाहेरून चकाचक दिसणाऱ्या नगर शहरातील हॉटेल औरसमध्ये आतून प्रचंड अस्वच्छता असल्याचे अन्न, औषध प्रशासनाच्या तपासणीत समोर आले ...
अहमदनगर : बाहेरून चकाचक दिसणाऱ्या नगर शहरातील हॉटेल औरसमध्ये आतून प्रचंड अस्वच्छता असल्याचे अन्न, औषध प्रशासनाच्या तपासणीत समोर आले आहे. विशेष म्हणजे याच हाॅटेलला मागील महिन्यात महापालिकेने स्वच्छतेचा प्रथम पुरस्कार देऊन गौरविले आहे.
अन्न, औषध प्रशासनाने नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२० मध्ये नगर शहरातील हॉटेलची तपासणी मोहीम हाती घेतली होती. ३० डिसेंबर रोजी शहरातील नगर-मनमाड रोडवरील सावेडी परिसरात असलेल्या हॉटेल औरसची (हॉटेल कपिराज) तपासणी केली. यावेळी हॉटेलच्या किचनमध्ये झुरळांचा मोठ्या प्रमाणात वावर आढळून आला. किचनमधील काही मशीनमध्ये मरून पडलेले झुरळ आढळून आले, कच्चे अन्नपदार्थ मुदतबाह्य झालेले होते. बारमध्ये मॉकटेल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे वेगवेगळे फ्लेवरचे क्रश मुदतबाह्य होते. तसेच हाॅटेलमध्ये वापरण्यात येणारे ब्रेड व इतर बेकरी पदार्थांवर कोणत्याही प्रकारचे लेबन वर्णन नव्हते. हाॅटेलमध्ये वेळोवेळी पेस्ट कंट्रोल न करणे, गोदामातील अन्नपदार्थ अस्ताव्यस्त ठेवणे, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा, फ्रीज व डी-फ्रिजमध्ये अन्नपदार्थ अस्ताव्यस्थपणे साठविणे, कामगारांची अस्वच्छता अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. या तपासणीनंतर अन्न, औषध प्रशासनाने हॉटेलला ६ जानेवारी २०२१ रोजी सुधारणा नोटीस देण्यात आली होती. हॉटेल व्यवस्थापनाने मात्र दिलेल्या मुदतीत काहीच खुलासा केला नाही. त्यामुळे अन्न, औषध प्रशासनाने १ फेब्रुवारी रोजी पुन्हा या हॉटेलची फेरतपासणी केली तेव्हा पहिल्याप्रमाणेच हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आली. ३४ मुद्द्यांपैकी केवळ ६ मुद्द्यांची पूर्तता करण्यात आलेली होती. याबाबत हॉटेलची २५ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात आली. यावेळीही हॉटेल व्यवस्थापनाला व्यवस्थित खुलासा करता न आल्याने अन्न, औषध प्रशासनाने २६ एप्रिल ते २ मे २०२१ या कालावधीसाठी हॉटेलचा परवाना निलंबित केला आहे. या काळात हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकाराचा व्यवसाय करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. अन्न, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं.पा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न, सुरक्षा अधिकारी श.मा. पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
------------
हॉटेल औरसची प्रथम तपासणी केली तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. यावेळी हाॅटेलला सुधारणा नोटीस देण्यात आली. हॉटेल व्यवस्थापनाने मात्र काहीच खुलासा केला नाही. त्यामुळे हॉटेलची पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा तेथे पहिल्याप्रमाणेच अस्वच्छता आढळून आल्याने कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हाॅटेलचालकांनी नियम पाळणे गरजेचे आहे.
- सं.पा. शिंदे, सहायक आयुक्त, अन्न, औषध प्रशासन, अहमदनगर