हॉटेल व्यावसायिकांनी बदलली नगर-पुणे रस्त्याची क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:24+5:302021-05-28T04:16:24+5:30

केडगाव : राज्यभरातील खवय्यांच्या जिभेवर अधिराज्य केलेल्या नगरमधील हॉटेल व्यावसायिकांनी नगर-पुणे रस्त्याची क्रेझ बदलून टाकली आहे. केडगाव औद्योगिक वसाहत ...

Hoteliers change the craze of Nagar-Pune road | हॉटेल व्यावसायिकांनी बदलली नगर-पुणे रस्त्याची क्रेझ

हॉटेल व्यावसायिकांनी बदलली नगर-पुणे रस्त्याची क्रेझ

केडगाव : राज्यभरातील खवय्यांच्या जिभेवर अधिराज्य केलेल्या नगरमधील हॉटेल व्यावसायिकांनी नगर-पुणे रस्त्याची क्रेझ बदलून टाकली आहे. केडगाव औद्योगिक वसाहत आणि ऑटोमोबाईल्सच्या आलिशान दालनांनी या मार्गाला झळाळी दिली. हजारो लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न हा मार्ग सोडवित आहे.

पुण्या-मुंबईच्या प्रवाशांचे ऐतिहासिक अहमदनगर शहरात स्वागत करणारा नगर-पुणे रस्ता आता कात टाकत आहे. आपले जुनेपण जपत आता हा मार्ग आधुनिकतेची कास धरत विकसित होत आहे. शहरातील स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानकापासून ते केडगाव बायपास चौकामार्फत मनपा हद्दीतील नगर-पुणे रस्ता आता काळाची पावले ओळखत बदलताना दिसत आहे. पुण्या-मुंबईहून येणाऱ्या वाहनांमुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा म्हणून ओळखला जातो. एकेरी असणारा हा मार्ग १५ वर्षांपूर्वी चौपदरी झाला आणि या रस्त्याला हायवेचा लूक मिळाला. याच मार्गावरील स्वस्तिक चौक, कायनेटिक चौक, सक्कर चौक या चौकांनी नगर शहराची जुनी ओळख आजही जपली आहे. व्हीआरडीईच्या वतीने कायनेटिक चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले. चौकात बसविलेले युद्ध सामग्रीचे चिन्ह नगरच्या लष्करी वैभवाचे दर्शन करून देत आहे.

राज्यभर ओळख तयार केलेल्या बड्या हॉटेल व्यावसायिकांनी नगर-पुणे मार्गावर नगरची खाद्यसंस्कृती जतन केली. यामुळे अस्सल खवय्ये याच मार्गावर आपली भूक भागवण्यात धन्यता मानतो. अलिशान इमारतींच्या हॉटेलांमुळे या रस्त्याची क्रेझ बदलली आहे. लहान-मोठ्या उद्योजकांनी एकत्र येत केडगाव औद्योगिक वसाहतीची स्थापना याच मार्गालगत केली. जवळपास ६० ते ७० उद्योग नगरच्या उद्योग विश्वाची ओळख करून देत आहेत.

चारचाकी, दुचाकी वाहनांच्या विक्रीची अलिशान दालने या मार्गाचा रूबाब वाढवत आहेत. सीना नदी म्हणजे या मार्गाची ऐतिहासिक ओळख बनली आहे. ब्रिटिशकालीन लोखंडी पूल कालबाह्य झाल्याने नव्या मार्गावर चौपदरीकरण असलेला पूल तयार झाला. केडगावसारखे नगरचे मोठे उपनगर या मार्गामुळे झपाट्याने विस्तारत आहे. या मार्गामुळे येथील विकास होण्यास चांगलाच हातभार लागला. लहान-मोठ्या हजारो व्यावसायिकांच्या रोजीरोटीची अडचण या मार्गामुळे सुटली. येथे विनायकनगर, माणिकनगर, भूषणनगर, ताराबाग यासारख्या वसाहती विकसित झाल्या व झपाट्याने विस्तारल्याही.

---

पहिला रेल्वे उड्डाणपूल आजही सुस्थितीत

शहरात आज मोठ्या उड्डाणपुलाचे काम सुरू असले तरी रेल्वेचा उड्डाणपूल नगर-पुणे मार्गावर ५० वर्षापेक्षा जास्त काळापासून नगरची ओळख बनला आहे. हा पूल सध्या तरी सुस्थितीत आहे. मात्र याचे कठडे आता धोकादायक बनले आहेत. या पुलावरून पूर्वी संपूर्ण नगर शहराचे दर्शन व्हायचे. आता उंच इमारतींमुळे ते होत नाही.

---

बड्या हॉस्पिटलची उणीव

नगर-पुणे मार्गावर सर्व प्रकारच्या व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले. मात्र अद्याप एकही सुसज्ज असे मोठे हॉस्पिटल या मार्गावर तयार झालेले नाही. सर्व सुविधांनी युक्त अशा दोन-तीन हॉस्पिटलची गरज येत्या काही वर्षात पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

---

नगर-पुणे मार्गालगत केडगाव येथे आमचा मोठा वाडा होता. आता हा वाडा काळानुरूप राहिला नसला तरी आमच्या परिवारातील या मार्गालगत छोटे-मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहोत. आमच्यासारख्या अनेकांना या मार्गामुळे व्यवसाय करण्याची संधी मिळाली.

-विठ्ठल कोतकर,

हॉटेल व्यावसायिक, केडगाव

270521\20210526_105121.jpg~270521\20210526_105743.jpg

नगर - पुणे रोड फोटो~नगर पुणे रोड

Web Title: Hoteliers change the craze of Nagar-Pune road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.