खडीक्रशरच्या ब्लास्टींगमुळे घरांना तडे; सरपंचाला जीवे मारण्याची धमकी

By Admin | Published: May 17, 2017 04:49 PM2017-05-17T16:49:51+5:302017-05-17T16:49:51+5:30

उक्कडगाव येथील खडीक्रशरच्या ब्लास्टींगमुळे अनेक घरांना तडे गेले असून, हे खडी क्रशर बंद करण्यासाठी शासनदरबारी उंबरठे झिजवणाऱ्या सरपंचालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे़

House cracks due to blotting cadre; Sarpanchal threatens to kill | खडीक्रशरच्या ब्लास्टींगमुळे घरांना तडे; सरपंचाला जीवे मारण्याची धमकी

खडीक्रशरच्या ब्लास्टींगमुळे घरांना तडे; सरपंचाला जीवे मारण्याची धमकी

आॅनलाईन लोकमत
अन्सार शेख
चिचोंडी पाटील, दि़ १७ - नगर तालुक्यातील उक्कडगाव येथील खडीक्रशरच्या ब्लास्टींगमुळे अनेक घरांना तडे गेले असून, हे खडी क्रशर बंद करण्यासाठी शासनदरबारी उंबरठे झिजवणाऱ्या सरपंचालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे़ विशेष म्हणजे २०११ साली दिलेला ‘ना हरकत’ दाखला ग्राह्य धरुन प्रशासनाने या खडी क्रशरला २०१६ मध्ये गौण खनिज उत्खननाचा आणि खडीक्रशिंगचा परवाना दिल्याची बाब उघड झाली आहे़
उक्कडगाव येथे २०११ साली खडीक्रशर सुरु करण्यात आले़ त्यावेळी ग्रामपंचायतीने खडीक्रशरसाठी ‘ना हरकत’ दाखला दिला होता़ मात्र, त्यानंतर या खडीक्रशरचे दुष्परिणाम गावाला भोगावे लागले़ त्यामुळे खडीक्रशरविरोधात गावकरी एक झाले़ त्यामुळे हे खडीक्रशर बंद करावे, या मागणीसाठी २०१२ ते २०१६ या कालावधीत ग्रामसभेत तीन वेळा ठराव मंजूर करुन ते जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे पाठविण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या ठरावास केराची टोपली दाखवली. त्यामुळे पाच वर्षांपासून हे खडीक्रशर बिनदिक्कत सुरु आहे. या खडीक्रशरचा परवाना नुतनीकरणास गावकऱ्यांचा विरोध असताना २०११ सालचा जुना ‘ना हरकत’ दाखला अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरुन सन २०१६ मध्ये या खडीक्रशरला परवानगी दिली.
सन २०१६ मध्ये खडीक्रशर चालकाने परवानगीसाठी अर्ज दाखल केला. व त्यास पाच वर्षापूर्वीचा ग्रामपंचायतीचा संमती अर्ज जोडून परवानगी दिली. खडीक्रशरसाठी वीस फुटापर्यंत परवानगी असताना सुमारे ८० फुटापर्यंत अनाधिकृत उत्खनन करण्यात आले. या अनधिकृत उत्खननाबाबत ग्रामपंचायतीने अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उत्खननासाठी होणाऱ्या ब्लास्टने परिसरातील विहिरींचे नुकसान झाले आहे तर काहींच्या घरांना तडे गेले आहेत. तसेच खडी वाहतूक होणाऱ्या मार्गालगत जिल्हा परिषद शाळा असल्याने वाहनांचा कर्कश आवाज व भरधाव वाहनांमुळे लहान मुलांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.
या खाणीच्या परिघ क्षेत्रामध्ये ६०० मीटर अंतराच्या आतमध्ये वस्त्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना या खडी क्रशरचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. हे खडीक्रशर बंद करावे, यासाठी ग्रामपंचायत २०१२ पासून पाठपुरावा करीत आहे़ मात्र, अधिकाऱ्यांनी अद्याप कार्यवाही केली नाही़ मात्र, खडीक्रशर चालकांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती उक्कडगावचे सरपंच नवनाथ म्हस्के यांनी ‘लोकमत’ला दिली़

Web Title: House cracks due to blotting cadre; Sarpanchal threatens to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.